जिल्हास्तरीय बचतगट प्रदर्शनीत सहभागी व्हा - जयश्रीताई शेळके* दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनचे आयोजन

जिल्हास्तरीय बचतगट प्रदर्शनीत सहभागी व्हा - जयश्रीताई शेळके
* दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनचे आयोजन 
मलकापूर/ नांदुरा : (एशिया मंच वृत्त)
        दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने बुलडाणा येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर ४ व ५ नोव्हेंबर रोजी भव्य जिल्हास्तरीय महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत राज्य आणि जिल्ह्यातील २०० वर स्टॉल लावण्यात येणार आहेत. बचतगट, महिला, उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी केले. 

     नांदुरा व मलकापूर येथे १३ ऑक्टोबर २०२३ रोजी दिशा बचतगट फेडरेशनच्या माध्यमातून जयश्रीताई शेळके यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बचतगटांच्या महिलांना मार्गदर्शन केले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महिलांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. प्रारंभी महानायिकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. महिलांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. पुढे बोलतांना जयश्रीताई शेळके म्हणाल्या, महिला बचतगट ही एक आर्थिक चळवळ आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य यामाध्यमातून करण्यात येते. दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनशी जिल्ह्यातील १४०० बचतगट संलग्न आहेत. या बचतगटांना मार्गदर्शन, प्रशिक्षण, बाजारपेठ, जाहिरात, अर्थसहाय्य उपलब्ध करण्याचे काम दिशा फेडरेशनद्वारे करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक बचतगटांनी याचा लाभ घेत उन्नती साधली आहे. यापुढील काळातही बचतगटांना भक्कम पाठबळ देण्याचे काम दिशा फेडरेशनच्या माध्यमातून करण्यात येईल, असा शब्द जयश्रीताई शेळके यांनी दिला. 

      मलकापूर येथील बैठकीला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील, 
 महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वनिताताई गायकवाड, बेटी पढाव बेटी बचावच्या शहराध्यक्ष अश्विनी देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या सुनिताताई पाटील, बचत गट प्रशिक्षिका उषाताई वनारे, अनिताताई डाके, मंदाकिनीताई चांभारे, शितलताई राजपूत, सुरेखाताई जंगले यांच्यासह बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या. तर नांदुरा येथे महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष सुनिताताई गोंड, स्वातीताई भोंड, धनश्रीताई बडे, ज्योतीताई लवळकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.