अग्निवीर अक्षय गवते यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त) पिंपळगाव सराई (ता. बुलढाणा) येथील अग्निवीर जवान अक्षय लक्ष्मण गवते याच्या पार्थिवावर आज 23 ऑक्टोबर 2023 रोजी शोकाकुल आणि देशभक्तीमय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केले.
अग्निवीर जवान अक्षय यास जम्मू काश्मीमधील सियाचीन ग्लेशिअर येथे तैनात असतांना २१ ऑक्टोबर रोजी वीरमरण आले. आज मूळगावी पिंपळगाव सराई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अक्षय गवते हा २० डिसेंबर २०२२ रोजी सैन्यात अग्निविर म्हणून भरती झाला होता. सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्याची सियाचीन येथे पोस्टिंग झाली होती. कर्तव्यावर असतांना २१ ऑक्टोबर 2023 रोजी त्याला वीरमरण आले.
आज २३ ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंपळगाव सराई येथे वीर जवान अक्षय गवते यांना शेवटचा निरोप देण्यात आला. मुलाच्या खांद्यावर शेवटचा निरोप मिळावा अशी अपेक्षा वडिलांची असते परंतु अक्षयच्या वडिलांवर मात्र अक्षयला अग्नी देण्याची वेळ आली. हे पाहून प्रत्येक उपस्थितांचे मन हेलावून गेले.
वीर जवान अक्षय गवते यांना २० ऑक्टोबर च्या रात्री दरम्यान सियाचीन येथे कर्तव्यावर असताना वीर मरण आले होते. काल २२ ऑक्टोबरला त्यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले. आज २३ ऑक्टोबरला सकाळी १० च्या सुमारास अक्षयचे पार्थिव मुळ गावी पिंपळगाव सराई येथे आणण्यात आले. अक्षयच्या घरी पार्थिव नेण्यात आल्यानंतर तिथून अक्षय यांच्या शेतापर्यंत अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. ठीकठिकाणी अक्षय यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. भारत माता की जय, वंदे मातरम्, अमर जवान अक्षय गवते अमर रहे या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. अक्षय यांच्या शेतात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
