लीगल एज्युकेशन प्रोग्राम राबविणारी बीसीएमजी ही भारतातील एकमेव संस्था - न्यायमुर्ती स्वप्नील खटी

लीगल एज्युकेशन प्रोग्राम राबविणारी बीसीएमजी ही भारतातील एकमेव संस्था - न्यायमुर्ती स्वप्नील खटी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
    वकिली व्यवसायामध्ये नव्याने पदार्पण करणाऱ्या नवोदित तरुण वकिलांना न्यायव्यवस्थेतील सर्व कंगोरे जाणून घेण्यासाठी व न्यायव्यवस्थेतील नवीन आव्हानांना यशस्वीरित्या सामोरे जाऊन एक आदर्श वकील कसे होता येईल, या संदर्भात येथील लीगल एज्युकेशन प्रोग्राम ही संकल्पना राबवणारी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ही देशातील पहिली संस्था आहे त्याबद्दल आपल्याला अभिमान असून त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायाधीश  स्वप्निल खटी यांनी केले .
       बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी आयोजित केलेल्या जेष्ठ श्रेष्ठ विधिज्ञ एड. बी. ई. आव्हाडसर मेमोरियल बेसिक लिगल एज्युकेशन प्रोग्राम या एक दिवशीय कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि बुलढाणा बार असोसिएशन यांचे विद्यमाने जिल्ह्यातील नवोदित वकीलांसाठी बेसिक लिगल एज्युकेशन प्रोग्राम हा एकदिवसीय कार्यक्रम स्थानिक बुलडाणा अर्बन सोसायटीच्या गोवर्धन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. 

     या कार्यक्रमात राज्य बार कौन्सिलचे अध्यक्ष एडवोकेट विवेकानंद घाटगे , बार कौन्सिल लिगल एज्युकेशन प्रोग्रामचे चेअरमन एडवोकेट संग्राम देसाई ,जळगाव येथील जेष्ठ विधीज्ञ एडवोकेट सुशील अत्रे, बार कौन्सिलचे बुलडाणा पालक सदस्य एडवोकेट आशिष देशमुख, बुलडाणा बार अध्यक्ष विजय सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती . या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून वकिली व्यवसायात गेल्या तीन वर्षात नव्याने प्रविष्ट झालेल्या वकिलांची व महिला वकिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमात बार कौन्सिलचे बुलढडाणा पालक सदस्य एडवोकेट आशिष देशमुख यांनी प्रास्ताविकपर विचार व्यक्त केले. त्यांनी राज्य बार काऊंशिलने प्रकाशित केलेल्या दिवाणी व फौजदारी प्रक्रियाबाबत पुस्तकाविषयी माहिती देऊन ते पुस्तक नवीन व्यवसायात आलेल्या प्रत्येक वकिलांनी वाचावे व अनुसरावे असे आवाहन केले.
    बार कॉन्सिलचे चेअरमन ऍडव्होकेट विवेकानंद घाडगे यांनी वकिली व्यवसायातील अनुभव त्यातील बारकावे हल्लीच्या न्याय व्यवस्थेतील नवीन आव्हाने व त्यांचे अनुभव यावर अत्यंत विनोदी शैलीमध्ये प्रकाश टाकला. त्याचबरोबर आपल्याला कॉपी पेष्टचे संभाव्य दुष्परिणाम सोदाहरण, खुमासदार शैलीने पटवून सांगितले. अपेक्षित निकाल हवा असेल तर आपण कोण कोणत्या गोष्टी प्रामुख्याने केल्या पाहिजेत त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर संग्राम देसाई यांनी वकील व्यवसायातील विविध पैलू बाबत मार्गदर्शन केले. वकिली व्यवसाय सुरू करताना आपण या व्यवसायात फक्त पैसा मिळविण्यासाठी आलो एवढेच ध्येय समोर न ठेवता, आपल्याला गुणवत्तेच्या एका उंचीपर्यंत जायचे आहे, हेच ध्येय सदैव डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी . त्यानंतर पैसा ही अनुषंगिक गोष्ट असल्याने निश्चितपणे, योग्य त्या प्रमाणात खात्रीलायक रित्या मिळेलच असे त्यांनी प्रतिपादित केले. सरळ मार्गाने न्याय अशक्यप्राय वाटत, असल्यास पारंपरिक पद्धतीने विचार न करता, नवीन नवीन युक्तया शोधून युक्तिवाद करण्यासाठी स्व मेंदूला प्रशिक्षित करावे. आपली शक्ती स्थळे, कमजोरीस लक्षात ठेवून प्रत्येक क्रिमिनल केसच्या मुळापर्यंत जाऊन सर्वांगीण अभ्यास करावा. त्यांनंतर जळगाव येथील ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट सुशिल अत्रे यांनी मेडिकल ज्यूरीसप्र्यूडन्स या विषयावर अत्यंत सविस्तर मार्गदर्शन केले. कोणत्याही कोर्टाला चमत्कार हा प्रकार मान्य नसल्याने, वकिली व्यवसायात वैद्यकीय अहवाल व फोरेन्सिक रिपोर्ट यांच्या वाढत्या महत्वाबाबत माहिती देऊन ,त्याचा वापर कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
       सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा सचिव एड. अमर इंगळे तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन एड. विजय सावळे अध्यक्ष बुलडाणा जिल्हा बार असोसिएशन यांनी केले.