कंत्राटी भरतीविरोधातील वंचित युवाच्या लढ्याला यश * सरकारने जनहित डावलल्यास पुढेही लढा तीव्र करू : सतीश पवार

कंत्राटी भरतीविरोधातील वंचित युवाच्या लढ्याला यश 
* सरकारने जनहित डावलल्यास पुढेही लढा तीव्र करू : सतीश पवार
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला प्रारंभीच वंचित बहुजन युवा आघाडीने आंदोलने, निवेदनांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण विरोध दर्शविला. वंचित युवा आघाडीच्या कंत्राटी नोकरभरती विरोधातील लढ्याला अखेर यश आल्याचे सांगत यापुढेही सरकारने जनहित न पाहिल्यास लढा अधिक तीव्र केला जाईल, असे वंचित युवाचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
      यापूर्वी सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठीदेखील वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन उभारण्यात आले होते. अनोख्या पद्धतीने केलेली आंदोलने चांगलीच चर्चेत राहिली. दरम्यान, राज्य शासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सुरुवातीलाच वंचित बहुजन युवा आघाडीने प्रखर विरोध दर्शविला. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदने पाठवण्यात आली. आंदोलनांच्या माध्यमातून कंत्राटी भरती प्रक्रियेचा निर्णय रद्द करण्याची मागणी रेटून धरली. त्याचप्रमाणे राज्यभरातूनही शासनाविरोधात संतापाची लाट उसळली होती. अखेर शासनाला झुकावे लागले आणि कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय रद्द करावा लागला.

      हा लढा आपण जिंकल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत सतीश पवार म्हणाले, केवळ आपल्या ऐक्यामुळे व सातत्यमय संघर्षामुळे हे शक्य झाले. परंतु आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही. आता येथून पुढे आपला लढा अधिक तीव्र करावा लागेल. कारण यामध्ये जिल्हा परिषद शाळांबाबत अजूनही काही स्पष्ट निर्णय घेण्यात आला नाही. वंचित बहुजन समाजाला प्रवाहात येण्यासाठी केवळ शिक्षण हेच एकमेव माध्यम आहे. त्यामुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सर्वांना मोफत व सक्तीचे असावे, यासाठी घटनेमध्ये मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहे. कायदा हा केवळ जागरूक लोकांनाच मदत करतो. झोपलेल्या लोकांसाठी तो कुचकामी ठरतो. भावी पिढीचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी साथ देऊन लढा उभारायला हवा, असे मतही सतीश पवार यांनी व्यक्त केले.