माजी आमदार विजयराज शिंदे
* मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
शासन आपल्या दारी या कार्यक्रमा साठी बुलडाणा येथे ३ सप्टेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आगमन झाले होते. यावेळी भाजपा नेते लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनी मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन सादर करून बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, राज्यभरात 25 जुलै ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये 41 महसूल मंडळात सलग 21 दिवस पाऊस पडलेला नाहीये. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा सुदधा समावेश आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. कापूस व सोयाबीन चा हजारो हेक्टरवर सर्व मशागत खर्च करून शेतकऱ्यांनी पेरा केलेला आहे. परंतु दोन तीन आठवडे उलटून ही पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी पिके करपत आहे. पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र सध्या पाऊस पडत नसल्यानं पीकं धोक्यात आली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत. अजून आठवडाभर पाऊन न पडल्यास पिके पूर्णतः निस्तनाभूत होण्याची चिन्हे दिसत आहे.
जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थितीही खालावलेली 50 % सुद्धा जलसाठा झालेला नाही त्यामुळे पिण्याचे पाण्याचे संकट ओढवलेले आहे. जनावरांची पाण्याअभावी गैरसोय होत आहे. सदर स्थिती गंभीर असून तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
तरी ही बाब लक्षात घेऊन बुलडाणा जिल्हा दुष्काळ ग्रस्त घोषित करावा व उपाययोजना सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी निवेदना अंती केली आहे.
