मुख्यमंत्र्यांना दिले सुशिक्षित बेरोजगारांच्या एक लाख स्वाक्षरीचे भले मोठे निवेदन * वंचित युवा आघाडीने अभिनव पद्धतीने वेधले सरकारचे लक्ष

मुख्यमंत्र्यांना दिले सुशिक्षित बेरोजगारांच्या एक लाख स्वाक्षरीचे भले मोठे निवेदन 
* वंचित युवा आघाडीने अभिनव पद्धतीने वेधले सरकारचे लक्ष 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
         सुशिक्षित बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांच्या हिताचे निर्णय तत्काळ घ्यावेत, या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने एक लाख स्वाक्षरी अभियान राबवले. लाखभर सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज बुलढाणा येथे दिले जाणार होते. मात्र, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधवांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटले. बुलडाणा जिल्ह्यातही मराठाबांधव आक्रमक झाले. तापलेले वातावरण आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने केलेली विनंती लक्षात घेऊन एक लाख स्वाक्षरीचे भले मोठे निवेदन वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी स्थापन केलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात सादर केले. 
       सुशिक्षित बेरोजगारांच्या एक लाख स्वाक्षरींचे निवेदन देऊन अभिनव पद्धतीने सरकारचे लक्ष वेधण्यात आले. स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना आकारण्यात येणारे अवास्तव शुल्क माफ करण्यात यावे, त्यांना पसंतीक्रमाप्रमाणे परीक्षा केंद्र द्यावे, या अगोदरच्या परीक्षे संदर्भातील अनुभव लक्षात घेता परीक्षेची पारदर्शकता कायम राहावी व पेपर फुटीच्या घटना वारंवार घडू नये, यासाठी स्पर्धा परीक्षांच्या सर्वच परीक्षा घेण्याचे अधिकार महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाला द्यावे, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वंचित बहुजन युवा आघाडी विविध आंदोलनांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे. परंतु शासन, प्रशासनाने आतापर्यंत सकारात्मक निर्णय घेतला नाही. ही बाब आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जातीसमूहातील मुलांना गुणवत्ता असतानादेखील परीक्षेपासून वंचित ठेवणारी आहे. या समस्येची तीव्रता शासनाच्या लक्षात आणून या गंभीर बाबीवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी 'एक लाख स्वाक्षरी अभियान' राबवण्यात आले. 
       याच मागणीसाठी २८ ऑगस्ट रोजी सतीश पवार यांच्या नेतृत्वात 'टॉवर आंदोलन' करण्यात येणार होते. मात्र, टॉवरवर चाढण्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. तोंडावर शासन आपल्या दारी कार्यक्रम असल्याने कोणतेही आंदोलन करू नये, अशी विनंती जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केली. ३ सप्टेंबरला होणाऱ्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्तात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी तुम्हाला पाठवू, शब्द दिला होता. दरम्यान, वंचित बहुजन युवा आघाडीने 'एक लाख स्वाक्षरी अभियान' अवघ्या काही दिवसांत राबवले. हे भले मोठे निवेदन जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते आज निघाले होते. मात्र, जालना जिल्ह्यातील लाठीमार प्रकरण चिघळल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले. याबाबत दक्षता घेत पोलीस तथा प्रशासनाने निवेदन देण्यास परवानगी नाकारली. अखेर हे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्षात सादर करण्यात आले.
     यावेळी जिल्हा संघटक बाला राऊत, जिल्हा महासचिव अर्जुन खरात, चिखली तालुकाध्यक्ष राहूल वानखेडे, मेहकर तालुकाध्यक्ष राहूल दाभाडे, देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष संतोष कदम, लोणार तालुकाध्यक्ष गौतम गवई, सतीश गुरचवळे, सदाशिव वानखेडे, वसंता वानखेडे, राहूल साळवे, ॲड . एस. एस. सुरडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

* जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा विनंती : 
      सद्यपरिस्थिती पाहता जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते पुन्हा एकदा विनंती केली. सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणते, असे आश्वासन देत विसपुते यांनी यावेळी निवेदनाचा आग्रह धरू नये, असे सांगितले. त्यामुळे वंचितने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. यानंतरही सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचे सतीश पवार यांनी सांगितले.