'वंचित'च्या स्वाक्षरी अभियानाला गति
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
सुशिक्षित बेरोजगार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या हिताचे निर्णय तत्काळ घ्यावेत, अशी मागणी रेटून धरत वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने ३ सप्टेंबर २०२३ रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना एक लाख सह्यांचे निवेदन दिले जाणार आहे. त्यादृष्टीने स्वाक्षरी अभियानाला युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार विविध आंदोलने करत आहेत. आंदोलनांसाठी अभिनव पद्धतीचा अवलंब केला जात आहे. ३ सप्टेंबर रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना सुशिक्षित बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या एक लाख स्वाक्षरींचे निवेदन युवा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात दिले जाणार आहे. ही स्वाक्षरी मोहीम सध्या जिल्हाभरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जोरात राबवली जात आहे. युवकांकडूनही स्वाक्षरी अभियानाला प्रतिसाद मिळत आहे. एक लाख सह्यांच्या असंख्य पानांचा मोठा गठ्ठा तयार होणार असून, ते निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले जाणार आहे.
