महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात यावे
* डॉ.सौ. ज्योतीताई खेडेकर यांची न.प. ला निवेदनाद्वारे मागणी
चिखली : (एशिया मंच वृत्त) महिला वर्गांना नेहमी काही घरगुती कामानिमित्त बाहेर पडावे लागते. बाहेर पडल्यानंतर त्यांना नेहमी एक प्रश्न त्यांना सतत भेडसावत असतो ते म्हणजे स्वच्छतागृहाचा याच प्रश्नाची दखल घेऊन जि.प. सदस्या तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष डॉ. सौ. ज्योतीताई खेडेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नगर पालिका यांना निवेदन देऊन शहरातील गर्दीच्या ठिकाणी, रस्त्याच्या दुतर्फा, बस, टॅक्सी, रिक्षा स्टॅन्ड, पालिका कार्यालये यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याचे मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी नगर पालिका चिखली यांचेकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात डॉ.सौ. ज्योतीताई खेडेकरांनी नमुद केले आहे की, नोकरी वा कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलांसाठी आवश्यक ती स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने महिलांची कुचंबणा होते. गर्दीच्या ठिकाणी, रस्त्याच्या दुतर्फा, बस-रिक्षा स्टँड, पालिका कार्यालये यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छतागृहं असणं हा महिलांचा मूलभूत अधिकार आहे असं मत कोर्टाने नोंदवलंले असतांनाही तसेच आवश्यक सुविधा म्हणून नगर पालिकांनी ही स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे त्यांचे कर्तव्य असूनही
महिलांसाठी स्वच्छतागृह पुरेशा प्रमाणात नाहीत. त्यामुळे शहरातील डी. पी. रोड, बाबुलॉज चौक, जयस्तंभ चौक, चिंच परिसर याठिकाणी महिलांसाठी नवीन स्वच्छतागृह बांधण्यात यावी व बस स्थानकावर असलेले महिला स्वच्छतागृह बंद पडलेले असल्याने प्रवासी महिलांचे देखील हाल होत आहेत. तरी ते सुरु करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात असे देखील निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
* महिलासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावे : डॉ. ज्योती शिवशंकर खेडेकर
स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने महिलांना आरोग्य समस्या जाणवतात, असे मत डॉ. शिवशंकर खेडेकर यांनी व्यक्त केले. मूत्राशय जर वेळीच मोकळे केले नाही तर खूप वेळ यूरिन साठून राहिल्याने मूत्र मार्गावर संसर्ग होतो. असे झाल्यास लघवीची आग होणे, सतत लघवीला जावे लागणे किंवा लघवी थोडी , थोडी होणे, अशा समस्या येऊ शकतात. स्त्रियांसाठी जवळपास स्वच्छतागृह नसतील व वारंवार लघवी नियंत्रित करावी लागली तर मूत्रशयांचा आजार होण्याचा धोका असतो. वयस्कर महिलांचे लघवीवरचे नियंत्रण कमी असते. त्यामुळे स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे गरजेची आहेत.
____________________________________
