बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
वकिली क्षेत्रात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सहायक सरकारी अभियोक्तापदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली परीक्षा ॲड. शांताराम मोरे यांनी उत्तीर्ण केली आहे. ॲड. मोरे गत पंधरा वर्षांपासून नागपूर येथे वकिली व्यवसाय करत आहेत.
मूळचे मोताळा तालुक्यातील वडगाव खंडोपंत येथील रहिवासी असलेले ॲड. शांताराम सुखदेव मोरे हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण घेतले. उच्च शिक्षण घेऊन अनेक पदव्या प्राप्त केल्या. बीकॉम, एलएलबी, एलएलएम व बाबासाहेब आंबेडकर विचारधारेमध्ये एमए पदवी प्राप्त केली आहे.
२०१६ मध्ये प्रथम न्याय दंडाधिकारीपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत केवळ एका गुणाने त्यांची संधी हुकली होती. विधि परीक्षा नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयातून उत्तीर्ण केली. विधि पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर २००७ पासून ते नागपूर येथील जिल्हा न्यायालय तथा उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करीत आहेत.
सहायक सरकारी अभियोक्तापदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. २९४ क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. मुलाखतीमध्ये ५३१ उमेदवारांमधून सर्वाधिक ३८ गुण घेणारा एकच उमेदवार होता. त्या खालोखाल ३५ गुण संपादन करणाऱ्या दहा ते पंधरा उमेदवारांमध्ये ॲड. मोरे यांचा समावेश आहे. हे यश प्राप्त करून शांताराम मोरे यांनी गावासह जिल्ह्याची मान उंचावली आहे.
