टू- व्हीलर गॅरेज चालकांच्या समस्यांबाबत पाठपुरावा करु - संदीपदादा शेळके
* जिल्हा टु-व्हिलर गॅरेज असोसिएशनचा ८ व्या वर्धापन दिन उत्साहात
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      प्रत्येक व्यावसायिक जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्याचे काम करतो. जिल्हा टू- व्हीलर गॅरेज चालकांचे सुद्धा योगदान मोठे आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करु, अशी ग्वाही राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी दिली.
      जिल्हा टु-व्हिलर गॅरेज असोसिएशनच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२३ रोजी बोथा धरण परिसरातील अवलिया महाराज संस्थानमध्ये आयोजित चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष प्रमोद आमले, सचिव प्रवीण गार्वे, रवींद्र राऊत, सोनाजी खर्चे, नीलेश रिंढे, शे. अन्सार भाई, ज्ञानेश्वर वाघ, गणेश खवले, गजानन कातोरे यांच्यासह टू- व्हीलर गॅरेज चालक उपस्थित होते.

     पुढे बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले, वन बुलढाणा मिशन ही लोकचळवळ आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन ही चळवळ कार्यरत आहे. टू- व्हीलर गॅरेज चालक सुद्धा जिल्ह्याच्या विकासात भर घालण्याचे काम करतात. दुचाकी ही सर्वसामान्य माणसाची दैनंदिन गरज आहे. दुचाकीशिवाय कोणतीच कामे वेगात होऊ शकत नाही. टू- व्हीलर गॅरेज चालक यामाध्यमातून सर्वस्तरातील नागरिकांच्या दुचाकींचे आरोग्य जपण्याचे काम करीत आहेत. राजर्षी शाहू परिवार कायम त्यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही संदीपदादा शेळके यांनी यावेळी दिली.