चिखली शहरातील अवैध वरली- मटका व्यवसाय त्वरीत बंद करा* अन्यथा भिमसेना सामाजिक संघटनेचा आंदोलनाचा इशारा* जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक महामुनी यांच्याशी भाई मनिष गवई यांनी केली चर्चा

चिखली शहरातील अवैध वरली- मटका व्यवसाय त्वरीत बंद करा
*  अन्यथा भिमसेना सामाजिक संघटनेचा   आंदोलनाचा इशारा
*  जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक महामुनी  यांच्याशी भाई मनिष गवई यांनी केली चर्चा 
चिखली : (एशिया मंच वृत्त)
     भिमसेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई मनिष गवई यांनी मागील महिन्यात 6 जुलै 2023 रोजी चिखली शहरातील अवैध वरली- मटका व्यवसायाच्या संदर्भात निवेदन दिले होते. यापूर्वीही या संघटनेने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना याच संदर्भात निवेदन दिले होते. त्यांचे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून चिखली शहरातील  अवैध वरली-मटका व्यवसाय विरोधात लढा सुरू आहे. या संदर्भात भाई मनिष गवई  यांनी परत एकदा 2 ऑगस्ट 2023  रोजी  जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक महामुनी  यांच्याशी चर्चा केली. यामध्ये त्यांनी  अवैध वरली-मटका व्यवसाय बंद  करण्यात यावा अशी मागणी त्यांनी रेटून धरली.       चिखली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटीका परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, श्री संकट मोचन हनुमान मंदीर मागील परिसर, मार्केट परिसर अशा अनेक ठिकाणी सर्रासपणे अवैध वरली व्यवसाय जोमात सुरु असुन दररोज कोणत्या न कोणत्या कारणास्तव डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटीका परिसरात अवैध वरली व्यवसायामुळे भांडणे चालु असतात. गेल्या अनेक महिन्यापासुन भिमसेना सामाजिक संघटना तथा शहरातील काही पक्ष, संघटना यांनी अनेकवेळा अवैध वरली व्यवसाय संदर्भात निवेदन देवुन सुध्दा पोलीस प्रशासनाचे जाणुन बुजून दुर्लक्ष होत आहे. 
     चिखली शहरामध्ये ठिकठिकाणी अवैध वरली व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
त्याचप्रमाणे व्हीडीओगेम देखील शहरामध्ये सर्रासपणे सुरु आहे. सदर अवैध वरली व्यवसायाच्या पायी शेकडो संसार उधवस्त होत आहेत कारण गोर-गरीब, मजुर, कष्टकरी हे अवैध वरली व्यवसायाच्या आकड्यावर तसेच व्हीडीओ गेमवर आपले मोल मजुरीचे पैसे लावतात परिणामी गोरगरीब जनतेच्या कुटूंबाची उपासमारी होत आहे. त्याचप्रमाणे कास्तकार हे शेती मालाचे पैसे अवैध वरली, व्हीडीओ गेम यामध्ये बरबाद करतात. परिणामी कर्जबाजारी होवुन आत्महत्तेचा विचार करतात व अवैध वरली, व्हीडीओ गेम किंग ह्या घामाच्या पैशावर लाखो रुपये कमवीत आहेत. ही सारी भयावह स्थिती टाळण्यासाठी चिखली शहरातील अवैध
वरली, व्हीडीओ गेम संपूर्णपणे बंद होणे गरजेचे आहे. व कायद्याचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे. आणि आजरोजी कायद्याचा धाक  ह्या अवैध वरली व्यवसाय करणाऱ्यावर राहीलेला नाही. ह्या संदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक महामुनी  यांच्याशी चर्चा करण्यात आली. 
      यावेळी त्यांनी  सांगीतले की, चिखली शहरातील अवैध धंदे ह्याकडे जातीने लक्ष देवुन त्वरीत बंद करु असे आश्वासन सुध्दा जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक  महामुनी  यांनी दिले.