जिल्ह्याला देशसेवेचा समृद्ध वारसा- संदीपदादा शेळके* सुभेदार गजनान गव्हाणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त डोंगरखंडाळ्यात सन्मान

जिल्ह्याला देशसेवेचा समृद्ध वारसा- संदीपदादा शेळके
* सुभेदार गजनान गव्हाणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त डोंगरखंडाळ्यात सन्मान
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       डोंगरखंडाळा गावाने सहकार, शेती, शिक्षणासोबतच देशसेवेचा वसा घेतला आहे. गावात आजरोजी जवळपास दीडशेवर आजी- माजी सैनिक आहेत. नजीकच्या भादोला येथे तीनशेहून जास्त सैनिक आहेत. एकट्या मासरुळ गावातील ४०० सैनिक देशसेवेत कार्यरत आहेत. रायपूर येथील हनवते कुटुंबातील प्रत्येक घरात एक तरी सैनिक आहे. पांगरी, नांद्राकोळी येथील मोठ्या संख्येने तरुण सैन्यात आहेत. देशसेवेच्या बाबतीत जिल्ह्याला समृद्ध वारसा लाभलेला आहे, असे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी केले. 
     तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील गजानन गव्हाणे यांनी 28 वर्षे सैन्यात देशसेवा केली. सेवानिवृत्त झाल्यावर गावकऱ्यांनी 3 मे 2023 रोजी त्यांच्यासह पत्नी संगीताताई आणि आई नर्मदाबाई यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून संदीपदादा शेळके बोलत होते. सरपंच बबनलाला गाडगे, उपसरपंच श्याम पाटील सावळे, शैलेशकुमार काकडे, दीपक महाराज सावळे, रवींद्र काकडे, तंटामुक्ती अध्यक्ष पप्पू सावळे, माणिकराव सावळे, अनंता सावळे, विकास सावळे, राजू गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
       पुढे बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले, सैन्यसेवा ही सर्वात मोठी देशसेवा आहे. जीवाची बाजी लावून जवान सीमेचे रक्षण करतात. अनेक सैनिक शहीद होतात. त्यांचे बलिदान विसरता येणारे नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाने सैनिकांचा आदर केला पाहिजे. 
 
* जय जवान, जय किसान : 
      राजर्षी शाहू परिवाराने शेतकऱ्यांसाठी नेहमीच नाविन्यपूर्ण योजना आखल्या आहेत. तदवतच आजी- माजी सैनिकांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जय जवान, जय किसान हा नारा घेऊन शेतकरी आणि सैनिक बांधवांसाठी काम करायचे आहे. सैनिक अन त्यांच्या कुटुंबियांच्या कुठल्याही समस्या प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही संदीपदादा शेळके यांनी दिली.