* आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी
साखरखेर्डा : (एशिया मंच वृत्त)
शुक्रवारपासून राज्यभरात गाजलेल्या इयत्ता १२ वी चा गणित विषयाचा पेपर सोशल मीडियातून फुटल्या प्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सिंदखेडराजा पोलिसांनी तक्रारीत साखरखेर्डा परिसरातील गावाचा उल्लेख करुन घेतला गेला होता. त्याअनुषंगाने हा गुन्हा साखरखेर्डा पोलिसांकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ मार्च, शनिवारी वर्ग करण्यात आला. दरम्यान काल पोलिसांनी पाच जणांना अटक करून आज 5 मार्च 2023 रोजी देऊळगाव राजा न्यायालयात हजर केले असता आरोपींना 10 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने तपास हाती घेतला. आपल्या कौशल्याचा वापर करीत पेपरफुटीसाठी कारणीभूत असणाऱ्या आरोपींचा शोध घेतला. संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यातून पाच आरोपी ज्यामध्ये दोन खाजगी शाळेवरील शिक्षक व इतर तिघांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. ह्या सर्व पाचही आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यावर पोलिसांनी त्यांना रात्री उशीरा अटक केली आहे. आरोपींमध्ये गजानन शेषराव आढे, वय ३४ वर्षे, रा. किनगाव जट्टू, ता. लोणार, गोपाल दामोधर शिंगणे, वय ३० वर्षे, रा. शेंदूरजन, गणेश शिवानंद नागरे, वय ३० वर्षे, पवन सुधाकर नागरे, वय २३ वर्षे व गणेश बद्रीनाथ पालवे तिघेही रा. भंडारी यांचा समावेश आहे.त्यांचेवर 1982 महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ अधिनियम 5 व 6 यासह कलम 420, 120 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी दोन शिक्षकांच्या मालकीच्या संस्था देखील आहेत यातील गोपाल दामोदर शिंगणे हा राजेगांवच्या परिक्षा केंद्रावर उपकंडक्टर होता. दरम्यान पोलीसांनी अद्याप कोणत्या परिक्षा केंद्रावरुन पेपर फुटला हे सिध्द केले नसून यात हमखास पेपर फोडण्याला सहकार्य करणारे शिक्षक अडकण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? ह्यासंदर्भातही उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नंदकिशोर काळे, पोहेकॉ रामदास वैराळ, पोहेकॉ निवृत्ती पोफळे, पोकॉ नितीन राजे जाधव, पोकॉ. प्रदीप सोभागे, गीते, लक्ष्मण इनामे पुढील तपास करीत आहेत