* शासन स्तरावर मिळाली मंजुरी, चार कोटीचा निधी उपलब्ध
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आमदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख संजय गायकवाड यांनी बुलडाण्यात बुध्दविहार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने आज शासन पातळीवर सदर कामांना मंजुरी मिळाली असून या कामासाठी तब्बल चार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच मागासवर्गियांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासाची होत असल्याचे बोलले जात आहे.
तथागत गौतम बुद्धांनी जेव्हा बौध्दधर्म स्थापन केला, त्यानंतर त्यांनी आपल्या अनुयायांना धर्मप्रचारासाठी जगात चारी दिशांना पाठविले. सदर अनुयाई येणार असल्याची माहिती मिळताच अनेक राजांनी त्यांच्या राहण्याचा बंदोबस्त केला होता. सदर ठिकाणाला विहार नाव देण्यात आले होते. प्रत्येक विहारात नंतरच्या काळात तथागत गौतम बुध्दाची मूर्ती या विहारात स्थापन करण्यात आली. तेव्हापासून बौध्द समाजाची पुजा पाठ विहारात केली जाते. बुलडाणा मतदार संघात आमदार संजय गायकवाड यांनी विकासाचा झंझावात उभा केला आहे. प्रत्येक समाजाला समान न्याय ते देत आहे. नुकतेच मुस्लीम समाजाने देखील त्यांना मतदार संघात शादी खाने उभारण्याची मागणी केली होती. त्यावर त्यांनी पाच कोटी रुपयाचे शादीखाने उभारण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर बुलडाणा मतदार संघातील मोताळा व बुलडाणा या ठिकाणी बौध्द विहार उभे करण्यात यावे अशी मागणी मागासवर्गिय समाजाने बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडे केली होती. सदर मागणीला गांभीर्याने घेत आमदार संजय गायकवाड यांनी मतदार संघात जवळपास 50 बौध्द विहार उभारण्याचे आश्वासन मागासवर्गिय समाजाला दिले होते. त्याअनुषंगाने नुकतेच शासनाच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत वर्ष 2022 या वर्षाकरिता बुलडाणा जिल्ह्यातील कामांना शासन स्तरावर विशेष मंजुरी देण्यात आली आहे. सदर कामात विविध विकास कामासह बुलडाणा विधानसभा मतदारसंघात तब्बल पन्नास बुद्ध विहाराचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी तब्बल चार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
सदरचे बुध्द विहार हे बुलडाणा तालुक्यातील सव, सागवान, हथेडी, कोलवड, तांदूळवाडी, गुमी डोंगर खंडाळा, वरवंड, सुंदरखेड, जनुना, पाडळी, राजुर, दहिद, तर मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी, खरबडी, चिंचपूर, जहागीरपुर, काळेगाव, जयपुर, फरदापुर, बाेरखेड, किनोळा, तरोडा, शिरवा, बोरखेडी, सर्वदा, रोहन खेड, राजुर, शेलापुर, उबाळखेड, पानेरा, बिरसिंगपूर, हनवत खेड, आदी गावांचा समावेश आहे राज्यात एकाच वेळी एखाद्या मतदारसंघात एवढ्या प्रमाणात बुद्ध विहार होण्याची सदरची घटना ही इतिहासातील पहिलीच असावी, त्यामुळे सर्व ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांनी सुरु केलेल्या विकास कामाच्या धडाक्याची चर्चा सुरु आहे.
पुढील वर्षी पुन्हा 50 विहार होणार - आ. संजय गायकवाड
बुलडाणा मतदार संघात यंदा 50 विहार बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्यावतीने यासाठी निधी व मंजूरी देखील आपणाला मिळाली आहे. येत्या वर्षात आणखी 50 बुध्द विहार आपण उभारणार आहोत.