* डिझेल अंगावर घेत माचीस काढताचं पोलीसांनी घेतले ताब्यात
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज ११ फेब्रुवारी २०२३ रोजी शेतकर्यांसह बुलढाणा किंवा मुंबई येथील पिक विमा कंपनीच्या एआयई कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या इशार्यामुळे प्रशासनात खळबळ उडून बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकरांना नोटीस बजावली होती. दुसरीकडे, तुपकरांनी मात्र आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत आता शहीद झालो तरी माघार घेणार नाही, अशी भूमिका जाहीर करून ते इशारा दिल्यापासून भूमिगत झाले होते. दरम्यान पोलीस विभागाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर व शहरात ठिकठिकाणी सुमारे अडिचशे पोलीसांचा फौजफाटा तैनात केलेला असताना तुपकरांनी एव्हढया मोठया संख्येने असलेल्या पोलीसांना चकमा देत पोलीस निरिक्षकांचा वेश परिधान करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचून आत्महनाचा प्रयत्न केला. अंगावर डिझेल घेतले . मात्र, माचीस काढण्यापुर्वीचं पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले व मोठा अनर्थ टळला.
* असा झाला आत्मदहन आंदोलनाचा थरार
शनिवार ११ फेब्रुवारीचा दिवस उजाडला आणि पोलिसांचे टेन्शन वाढले, तसेही दोन दिवसापासून शहरात व तुपकर यांच्या घरापुढे तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्हाभरातून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तुपकर यांच्या निवासस्थानी व स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटरवर जमू लागले. ११ वाजेच्या सुमारास सौ. शर्वरी तुपकर या घराबाहेर पडून नवऱ्याच्या चिंतेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पायी चालू लागल्या, अन् त्यांच्यामागे शेकडो कार्यकर्ते हातात फलक घेऊन व घोषणा देत - देत मार्गस्थ झाले. ठिकठिकाणी पोलीस करडी नजर ठेवून होते, वाहतुकीचा मार्गही बदलण्यात आला होता. कार्यकर्त्यांचा हा मोर्चा कोषागार अधिकारी कार्यालयाजवळ पोहोचला, बॅरिकेट्सना हटवून कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया पुढे धूम ठोकली व एकच गोंधळ उडाला. पोलीसही मागे पळू लागले. अन तेवढ्यातच तिथेच दबा धरून असलेले रविकांत तुपकर पीएसआय च्या वेशात कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रकटले व त्यांनी डोक्यावर डिझेल घेताच एकच गोंधळ उडाला. आता काय होणार ? ही परिस्थिती निर्माण झाली. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही काही समजत नव्हते. मात्र काडी पेटणार, तेवढ्यातच पोलिसांनी तुपकर यांना पकडले. तरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरवाजाजवळ ही गर्दी पोहोचलीच. तोंडात रॉकेल गेल्यामुळे तूपकरांनी तिथेच झोपून घेतले. इकडे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. शेवटी रविकांत तुपकर यांनी ते कापूस व सोयाबीन प्रश्नासाठी करीत असलेल्या आंदोलनाची संघर्षणात्मक भूमिका सांगून पिकविम्याचा प्रश्न पोटतितकीने मांडला. शेतकरी हे आंदोलन शांततेने करीत असल्यामुळे, पोलिसांनी शेतकऱ्यांवर कुठलीही जोर जबरदस्ती न करण्याचे आवाहन त्यांनी केले. गोळ्या घाला किंवा ठार मारा वा फासावर लटकवा, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हा संघर्ष चालूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. दरम्यान बुलडाणा पोलीस तुपकरांना घेवून जात असताना कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला असता पोलिसांनी लाठी चार्ज केला. दरम्यान पोलिसांनी तुपकर व कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅन मध्ये बसवून बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला आणले असून, कारवाई सुरू आहे.