* जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड यांचा इशारा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
बुलडाणा शहर मनापासून आवडले. इथले वातावरण आरोग्यासाठी पोषक असून, जिल्हयाचा क्राईम रेट त्या तुलनेत कमी असल्याचे सांगतानाचं जिल्हयात अनेक अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याची कुणकुण लागली आहे. मात्र या अवैध धंद्यायांना कुणाचा वरदहस्त आहे, तो व्यक्ती किती मोठा आहे. याची तमा न बाळगता अवैध धंद्यावर लगाम घालण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचा इशारा नूतन जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाडे यांनी दिला. यावर पत्रकारांनी जिल्हयातील मेहकर, चिखली, लोणार तालुक्यासह जानेफळ, डोणगांव पोलीस स्टेशनच्या सिमेत खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत माहिती दिली असता यापुढे ठाणेदारांच्या पोस्टिंग करताना त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या भागात अवैध धंद्यांचा आलेख कसा होता? हे बघूनच पोस्टिंग करणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, कधी कधी हस्तक्षेप हा अडचणींचा भाग ठरतो. कायदा व सुव्यवस्था पाळतांना हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचे ते म्हणाले. कुठलीही कारवाई करताना जात, धर्म, पंथ किंवा राजकीय गटतट यांचा विचार न करता निरपेक्ष कारवाई करणार करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. नुकतेच व्हाईस ऑफ मिडिया संघटनेच्या शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन जिल्हा पोलीस अधिक्षक आवाडे यांच्या दालनात जावून त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक विषयावरही ही मनमोकळा संवाद साधला. बुलडाणा शहराचे आरोग्याला पोषक असलेले वातावरण, निसर्ग संपदा तसेच बुलडाणा परिसरात पिकविला जाणारा भाजीपाला यावर देखील त्यांनी दिलखुलास संवाद साधला. या भेटीप्रसंगी व्हाईस ऑफ मिडियाचे शहर कार्यकारिणी अध्यक्ष गणेश निकम, कोषाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, सोहम घाडगे , गणेश उबरहंडे, शौकत शहा, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
