चिखली : (एशिया मंच वृत्त)
अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला उडवल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघात हा ३ नोव्हेंबरच्या रात्री साडे आठच्या सुमारास चिखली - साकेगाव रोडवरील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज जवळ घडला. या अपघातात धीरज विजय अंभोरे (२१) रा. अंत्री कोळी ता.चिखली असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार धीरज हा गावातील एका ट्रॅक्टरवर चालक होता. काल रात्री तो मोटारसायकल ने चिखलीकडे जात असताना अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज जवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तो अक्षरशः चिरडल्या गेल्या. अपघातानंतर अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन घटनास्थळा वरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने त्याला चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. धीरजच्या पश्चात आई, वडील व दोन मोठे भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.
