सोयाबीन - कापसाच्या आंदोलनाने आता महाराष्ट्र हादरवून सोडू : रविकांत तुपकर* जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेतकऱ्यांचा रेकार्डब्रेक मोर्चा

सोयाबीन - कापसाच्या आंदोलनाने आता महाराष्ट्र हादरवून सोडू : रविकांत तुपकर
* जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेतकऱ्यांचा रेकार्डब्रेक मोर्चा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड मोठी फौज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यात धडकली. शेतकरी आंदोलनातील गर्दीचे आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढत रेकॉर्ड ब्रेक मोर्चाने संपूर्ण बुलढाणा शहर दणाणून गेले होते. हा मोर्चा म्हणजे शेतकरी आंदोलनाचा शेवट नसून आजपासून खऱ्या अर्थाने लढाईला सुरुवात झाली आहे. सरकारला  आम्ही आठ दिवसांचा अल्टीमेटम देत आहेत, त्यानंतर प्रखर आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडू, असा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला.
         सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजुरांच्या न्याय्य हक्कासाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात रविवार, ६ नोव्हेंबर 2022 रोजी बुलढाण्यात शेतकऱ्यांचा अतिविराट असा एल्गार मोर्चा धडकला. चिखली मार्गावरील मोठ्या देवीपासून या मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाभरातून आलेले युवक, शेतकरी, मायमाऊल्या आणि शेतमजूर यांचा प्रचंड उत्साह, नारेबाजी आणि हातात रुम्हणे घेऊन हा मोर्चा मुख्य मार्गाने निघाला. एडेड चौक, तहसील चौक, संगम चौक, जयस्तंभ चौक यामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टेटबँक चौकात पोहचल्यावर मोर्चाचे रुपांतर विराट सभेत  झाले. यावेळी बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले की, भिक मागण्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांचा हक्क मागण्यासाठी, बळीराजाच्या घामाचे दाम मागण्यासाठी ही हक्काची लढाई आहे. राज्यात ऊस उत्पादक शेतकरी ९ टक्के तर सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ६८ टक्के आहे. ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करुन त्यांचा भाव मिळवून घेतात आता विदर्भ- मराठवाड्यातील सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ताकद दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी हा एल्गार पुकारला असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आहे. त्यामुळे भविष्यात आमदार, खासदारच काय कोणतेच पद मिळाले नाही तरी चालेल परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. सत्तेच्या मोहात आजवर कधीच पडलो नाही यापुढेही कोणताच मोह शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून मला वेगळे करु शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
         आयात - निर्यात धोरण आणि सोयाबीन-कापसाचे भाव याबाबतची अभ्यासपूर्ण मांडणी यावेळी रविकांत तुपकर यांनी केली. सोयाबीनचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च सहा हजारापर्यंत आहे तर सध्या भाव 4 हजारापर्यत आहे, कापसाला क्विंटलमागे 8 हजार 500  उत्पादन खर्च आणि सध्याचे भाव 6 ते 7 हजारापर्यंत आहेत. यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरुन निघणार नाही. त्यातच अतिवृष्टी व सततच्या पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50  हजारांची मदत द्यावी, सोयाबीनला किमान 8 हजार 700  रुपये आणि कापसाला 12 हजार 700  रुपये भाव स्थीर रहावा यासाठी सोयापेंड (डीओसी) नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, मागील वर्षी आयात केलेल्या 5 लाख मेट्रिक टन सोयापेंडला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ रद्द करावी, सोयापेंड आयात करु नये, यंदा 15  लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, सोयाबीनची वायदे बाजारावरील बंदी उठवावी, खाद्य तेलावरील आयात शुल्क 30  टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे 11 टक्के ठेवावे, कापूस व सूत नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, पिककर्जासाठी सीबीलची अट रद्द करावी, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम कर्जात वळती करु नये आदी मागण्या यावेळी रविकांत तुपकर यांनी मांडल्या. 
      राज्य आणि केंद्र सरकारने या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करावा. सरकारला 8  दिवसांचा अल्टीमेटम आम्ही देत असून त्यानंतर संपूर्ण राज्यभर आंदोलन पेटवून महाराष्ट्र हादरुन सोडू, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. विदर्भ अध्यक्ष दामोदर इंगाले यांनी आपल्या खास शैलीत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. रविकांत तुपकर हे नेतृत्व न्याय मिळवून देणारे आहे. त्यामुळे या नेतृत्वासाठी कोणत्याही लढाईला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे बोलणारे, भांडणारे आणि शेतकऱ्यांसाठी कोणतीच तमा न बाळगता लढणारे राज्याचे नेते आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ही तोफ राज्यभर धडाडत असते, आमच्या कांदा उत्पादक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ते धाऊन येतात, सरकारशी भांडून भाव मिळवून देतात त्यामुळे त्यांच्या नेतृत्वातील एल्गार मोर्चाला आपणही गेलेचे पाहीजे, या हक्काने मोर्चात आलो असे सांगत शेतकऱ्यांचे हे नेतृत्व सर्वांनी जपले पाहीजे, सांभाळले पाहीजे आणि या नेतृत्वाला बळ दिले पाहीजे, असे आवाहन प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी केले.