* निर्यात कार्यशाळा उत्साहात संपन्न
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
देशाच्या प्रगतीमध्ये निर्यातीला महत्व आहे. देश पातळीवर निर्यातीसाठी प्रयत्न होत असताना जिल्ह्यास्तरावरही निर्यातवाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. निर्यातीसाठी पायाभुत सोयीसुविधा आणि शासकीय मदत देण्यात येईल. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने निर्यातीसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.
गुंतवणुक वृद्धी, व्यवसाय सुलभीकरण, निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा हॉटेल नर्मदा हॉलीडेज येथे पार पडली. यावेळी वाशिमचे जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश कोईनकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, भारतीय स्टेट बँकेचे महाप्रबंधक संजय श्रीवास्तव, उपमहाप्रबंधक पंकजकुमार बरनवाल, क्षेत्रीय प्रबंधक विशोक कुमार, निर्यात सल्लागार सुनिल कोईनकर, सिडबीचे प्रबंधक श्री. नायक, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त श्री. केदार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनिल पाटील उपस्थित होते.
श्री. श्रीवास्तव यांनी निर्यातविषयक बँकेची भुमिका याबाबत मार्गदर्शन केले. श्री. नायक यांनी सिडबीच्या योजनांची माहिती दिली. श्री. विशोककुमार यांनी निर्यातदारांना बँकाकडून मिळणाऱ्या विविध योजना, सवलतीबाबत मार्गदर्शन केले. योगेश कोईनकर यांनी निर्यातदारांनी निर्यात करताना करारनाम्यांचा अभ्यास करण्याबाबत सांगितले. तसेच उद्योगात येणाऱ्या कायदेविषयक अडचणी आणि त्यावरील उपयुक्त कायदे, उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात सुनील कोईनकर यांनी निर्यातीमधील फायदे सांगून जिल्ह्यातील उद्योजकांना निर्यात वाढीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. श्री. डाबरे तसेच प्रवीण वानखेडे यांनी कृषी व अन्न प्रक्रिया प्रकल्प निर्यातवाढीसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी उत्पादक कंपनी व उद्योजक यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. अन्न प्रक्रिया उद्योग करताना आवश्यक परवाने ऑनलाईन पद्धतीने काढण्यासंदर्भातील तरतुदीबाबत मार्गदर्शन केले. निर्यात करताना येणारे संभाव्य धोके आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चैतन्य ॲग्री प्रोडक्टस यांनी माहिती दिली.
एक जिल्हा एक उत्पादन योजना, तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, पॉलीसी, सन 17-18 व 18-19 साठी निर्यात पुरस्कार नामांकने दाखल करणे, मैत्री पोर्टल बाबत माहिती श्री पाटील यांनी दिली. कार्यशाळेसाठी देशपांडे ब्रदर्स ॲन्ड कंपनी देऊळगाव राजा यांनी होमीओपॅथी उत्पादने, इलेक्ट्रीकल वाहन उत्पादन कंपनी बुलढाणा यांनी ई-व्हेईकल सादरीकरण केले, चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज, मलकापूर यांनी उच्च दर्जाचे न्यूट्रास्युटिकल्स आणि फार्मास्युटिकल्स कच्चा माल उत्पादने, युनानी हेल्थकेअर ॲन्ड आयुर्वेदिक प्रोडक्टस यांनी 250 उत्पादनाचे सादरीकरण केले. भारतीय स्टेट बँकेने त्यांच्याकडील राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या मार्गदर्शनासाठी स्टॉल लावला.
कार्यशाळेस ऑनलाईन पद्धतीने डीजीएफटी, व्यवसाय सुलभीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेसाठी हिंदुस्थान युनिलिव्हर खामगाव, बेन्झोकेम इंडस्ट्रीज मलकापूर, औद्योगिक संघटना, निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपनी, उद्योजक तसेच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मवारी उपस्थित हाते. कार्यक्रमासाठी बँक अधिकारी, मिटकॉन, एमसीइडी यांनी सहकार्य केले. श्री. पाटील यांनी प्रास्तविक आणि कार्यक्रमाचे ध्येयधोरणे सांगितली. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक नामदेव पाटील आभार मानले.