अनाथांची माय अन् सामूहिक विवाह सोहळा प्रणेत्याचे कार्य नेटाने पुढे नेणार* सुनील जवंजाळ पाटील यांचा निर्धार

अनाथांची माय अन् सामूहिक विवाह सोहळा प्रणेत्याचे कार्य नेटाने पुढे नेणार
* सुनील जवंजाळ पाटील यांचा निर्धार
  बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      अनाथांची माय स्व.सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण  आयुष्य खर्ची घातले. ती माय आता जगात राहिली नाही. दोन वर्षापुर्वी सामूहिक विवाह सोहळयाचे प्रणेते शिवाजीराव नवघरे यांचे निधन झाले. त्यांनीही आपले आयुष्य सामूहिक विवाह चळवळीसाठी समर्पित केले होते. या दोन समाज सेवकांचे कार्य नेटाने पुढे घेवून जाण्याचे कार्य पुढील आयुष्यात करणार असल्याचा निर्धार सुनील जवंजाळ यांनी केला आहे.
     बुलडाणा तालुक्यातील अंभोडा येथे 6 मार्च 2022 रोजी विनाशुल्क वधू-वर परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.  या निमित्ताने जिल्ह्यात सामूहिक विवाहाची निव रचणारे स्व. शिवाजीराव नवघरे यांची बंद पडलेली सामूहिक विवाहाची लोकचळवळ पुनर्जीवित होणार असून त्या निमित्ताने कित्येक सर्व सामान्य माणसांच्या मुलां, मुलीच्या लग्नासंदर्भातील समस्या सुटनार आहेत. तसेच अंभोडा येथे कुठल्याही शासकीय अनुदानाचा लोभ न ठेवता सेवाभावी दृष्टिकोनातून गावकऱ्यांच्या वतीने एक अनाथ आश्रम चालविण्यात येणार आहे. सदरच्या अनाथ आश्रमासाठी आवश्यक असलेली जागा स्वतःचे अंभोडा येथील राहते घर अनाथ आश्रमासाठी जवंजाळ पाटील यांनी निशुल्क उपलब्ध करून दिले आहे. जवंजाळ पाटील यांनी महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांमध्ये विनाशुल्क भोजन व्यवस्थेसह राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावे यशस्वीपणे पार पाडले असुन हरियाणा राज्यातील रौड मराठे यांना संघटित करून तिथे सुद्धा यशस्वी मेळाव्याचे आयोजन केले. तसेच मध्यप्रदेशातील समाज बांधवांसाठी बऱ्हाणपूर येथे मेळाव्याचे नियोजन सुरू आहे.
स्व.सिंधूताई सपकाळ व स्व. शिवाजीराव नवघरे यांनी सुरू केलेली समाज उपयोगी असलेल्या चळवळी मध्ये खंड न पडू देता ही चळवळ अविरतपणे पुढे चालू ठेवणे हीच खरी श्रद्धांजली स्व. सिंधुताई व शिवाजीराव यांना  ठरणार आहे.