वाहन निरीक्षक मोहिनी मोरे यांचा जिल्हा ग्रंथालयात सत्कार

वाहन निरीक्षक मोहिनी मोरे यांचा जिल्हा ग्रंथालयात सत्कार 

बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय बुलडाणा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची निर्मिती केली आहे. या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणारी मोहिनी दिलीप मोरे हीची नुकतीच एमपीएसएसी मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. या यशाबद्दल तीचा जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
      जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज अशी अभ्यासिका उपलब्ध आहे.  दरवर्षी या अभ्यासिकेत ठराविक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. कोरोना विषयक नियमांचे पालन करुन येथे विद्यार्थी दररोज अभ्यास करतात. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली विविध पुस्तके, संदर्भ ग्रंथ, यशस्वी अधिकाऱ्यांचे मनोगत, अभ्यासाठी आवश्यक असलेले वातावरण येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच यशस्वी अधिकाऱ्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन देखील येथे विद्यार्थ्यांना मिळते. मोहिनी दिलीप मोरे ही देखील जिल्हा ग्रंथालयातील अभ्यासिकेत नियमित अभ्यास करत होती. एमपीएससी परीक्षेत तीने यश मिळविले असून तीची नुकतीच सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी नियुक्ती झाली. नियुक्तीनंतर तीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात भेट दिली असता जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांनी तीचा सत्कार केला. जिल्हा ग्रंथालयातील सुसज्ज अभ्यासीकेचा आपल्याला मोठा लाभ झाला, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांनी आवश्यक असलेली प्रत्येक पुस्तके येथे उपलब्ध करुन देण्यासह अभ्यासासाठी कायम प्रोत्साहीत केले त्यामुळे आपल्या यश मिळण्यास मोठी मदत झाली, अशी प्रतिक्रिया यावेळी मोहिनी मोरे हीने व्यक्त केली. यावेळी कार्यालयातील कर्मचारी विक्रम सोनुने, धनंजय मरे, सय्यद जाकीर, गजानन जोशी यांच्यासह अभ्यासीकेतील विद्यार्थी उपस्थित होते.