बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
चिखली तालुक्यातील केळवद येथिल भरवस्तीत असलेल्या भारतीय स्टेट बँक शाखेवर 29 ऑक्टोंबरच्या मध्यरात्री दरम्यान चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकून सुमारे 20 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना शनिवारच्या सकाळी उघडकीस आली.
चिखली तालुक्यातील केळवद येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा असून त्या ठिकाणी केळवदसह अनेक गांवातील खातेदार या ठिकाणी जोडले गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत असून रोजची कॅश सुध्दा या ठिकाणी लॉकर सुविधा असल्याने तेथेच जमा असते. नेमके हेच हेरुन अज्ञात चोरट्यांनी दि.29 ऑक्टोंबरच्या रात्री 11.40 च्या दरम्यान बँकेच्या पाठीमागील भिंतीला असलेल्या खिडकीचे गज गॅस कटरच्या सहाय्याने तोडून आतमध्ये प्रवेश मिळवत त्या ठिकाणी कार्यरत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. तसेच बँकेचा विद्युत पुरवठा देखिल मुख्य स्वीच बंद करुन खंडीत केला. त्यानंतर बँकेत असलेल्या लॉकरचे कुलुप तोडून त्यामध्ये असलेली 20 लाखाची कॅश चोरुन पसार होण्यात यश मिळविले. दि.30 ऑक्टोंबर ला नेहमीच्या वेळेवर बँकेचा शिपाई त्या ठिकाणी बँक उघडून साफसफाई करण्याकरिता बँकेत गेला असता सदर दरोड्याचा प्रकार त्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला सदर प्रकार सांगितला असता केळवद गावामध्ये ही वार्ता वार्यासारखी पसरली. आणि गांवकर्यांनी बँकेकडे धाव घेतली. सदर बँक अधिकार्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच चिखलीचे ठाणेदार अशोक लांडे यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी करुन सदर प्रकाराची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया यांना दिली.
माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक चावरीया यांनी घटनास्थळाला भेट देवून तपासाची दिशा ठरवत तपास पथकास तपासकामी लावले. त्यानंतर तत्काळ या ठिकाणी श्वान पथकास पाचारण करुन ज्या खिडकीमधून चोरटे पसार झाले त्या दिशेने तपासास सुरुवात केली असता बँकेला लागून असलेल्या एका शेतात चोरट्यांचे हातमौजे आणि विजेरी आढळून आली. या वस्तुच्या आधारे श्वान पथकास दिशा मिळेल हा कयास लावल्या जात होता. परंतू श्वान पथक माग काढू शकले नाही.
या चोरीचा कसुन तपास करुन आरोपीचा छडा लावू – अरविंद चावरीया
सदर तपासकामी पथक तयार केले असून त्यांना वेगवेगळ्या दिशेने चोरट्यांचा मागावर पाठविण्यात आले आहे. लवकरच या चोरट्यांचा छडा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असे जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी सांगीतले.
