राष्ट्रीय रोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जनावरांना लसीकरण

 
जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

बुलडाणा  : राष्ट्रीय रोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जनावरांना लाळ खुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण करतानाच या जनावरांचे टॉगिंग करून त्यांना आता जनावरांना आधार क्रमांकासारखेच प्रमाणपत्र देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 1,07,482 गाय वर्गीय, 30, 125 म्हैस वर्गीय अशा एकूण 1,37, 607 जनावरांचे लसीकरण करून  टॉगिंग रण्यात आले आहे. टॉगिंगमुळे जनावरांची खरेदी विक्री व नैसर्गिक आपत्तीत जनावरे दगावल्यास भरपाई मिळण्यास सुलभ होणार आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद बुलढाणा विभागाचे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत एकूण 122 स्थानिक व 7 राज्यस्तरीय दवाखाने आहेत. या पशुसंवर्धन दवाखान्यात मार्फत गाय वर्गीय व  म्हैस वर्गीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. यावर्षी सर्व तेरा तालुक्यातील पशुवैद्यकीय संस्थांना एकूण 5,38,000 गाय वर्गीय व  म्हैस वर्गीय पशुधन वर्गाकरिता लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान जिल्ह्यातील गाय वर्गीय व  म्हैस वर्गीय 5,38,000 पशुधनासाठी 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर तोंड खुरी, पाय खूरी, लाळ खुरकत लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पशुधनाच्या कानात 12 आकड्यांचा क्रमांक असलेला टॅग (बिल्ला) म्हणजेच जनावरांचे ओळखपत्र किंवा आधार कार्डच्या क्रमांकांची नोंद शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन करण्यात आली आहे. या टॅग शिवाय शासनाची नुकसानभरपाई किंवा विमा मिळणार नाही, जनावरांची खरेदी व विक्री ही करता येणार नाही. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये लसीकरण व टॉगिंग करण्यात आले असून यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर पी.जी. बोरकर, जिल्हा परिषद सभापती राजेंद्र पळसकर,  अति मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांच्या मार्गदर्शक सूचना तर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर दिवाकर काळे यांनी सांगितले.