प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस यंदा ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा होणार!
* होर्डिंग, बॅनर, पुष्पहारांचा खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतनिधी उभारणार; मेहकरमध्ये संगीतमय रामायण कथेला प्रारंभ
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता, केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा २५ नोव्हेंबर रोजीचा वाढदिवस यंदा साध्या पद्धतीने ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त होणारा होर्डिंग, बॅनर, डिजिटल बॅनर आणि पुष्पहारांवरील अनावश्यक खर्च टाळून तो दुष्काळग्रस्त शेतकरी व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी वापरण्याचे आवाहन प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
जिल्ह्यात यंदा पावसातील खंडामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात वाढदिवसाचा उत्सव जाहिरातबाजी आणि दिखाव्यापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत सेवाकार्यातून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
* मेहकरमध्ये संगीतमय रामायण कथेला प्रारंभ
सेवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मेहकर येथे १९ नोव्हेंबरपासून रामरावजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून संगीतमय रामायण कथेला प्रारंभ झाला आहे. या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना प्रवचनाचा लाभ मिळत आहे. सेवा सप्ताहांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये शाल, पुष्पगुच्छ किंवा अन्य सत्कार साहित्य स्वीकारले जाणार नाही. त्याऐवजी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदतनिधी उभारण्यात येणार आहे.
दिखाव्याऐवजी सेवाकार्याला प्राधान्य
शिवसैनिकांनी वाढदिवसानिमित्त होर्डिंग, बॅनर व डिजिटल जाहिराती लावण्यापेक्षा गरजू नागरिकांना मदत करावी. दुष्काळग्रस्त शेतकरी, वंचित घटक आणि आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने सेवाभाव, सामाजिक जाणीव आणि शेतकऱ्यांप्रती बांधिलकी जपणारा हा ‘सेवा सप्ताह’ जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण करणारा ठरणार आहे.
