बुलढाण्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांची भर; रोबोटिक सर्जरीचा शासकीय योजनांमध्ये समावेशासाठी प्रयत्न करणार : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
* राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी; टुडे इको शिबिरात ६० बालकांची तपासणी, ४७ जणांवर होणार मोफत शस्त्रक्रिया
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी रोबोटिक सर्जरीचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय आयुष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
बुलढाणा येथील राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोबोटिक सर्जरीचा शुभारंभ, टुडे इको तपासणी शिबिर आणि एनएबीएल कार्यशाळेचे उद्घाटन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संजय गायकवाड, जागतिक ख्यातीचे रोबोटिक सर्जन डॉ. सुधीर श्रीवास्तव, मंगेश चिवटे, अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक अचूक, सुरक्षित आणि परिणामकारक होत आहेत. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना कमी त्रास होऊन शस्त्रक्रियेतील अचूकता वाढते. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी रोबोटिक सर्जरीचा शासकीय आरोग्य योजनांमध्ये समावेश करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त एस.एस. मंत्रा रोबोटिक्स कंपनीने सुमारे १६ कोटी रुपये किमतीचा भारतीय बनावटीचा रोबोटिक सर्जिकल रोबोट महाविद्यालयाला भेट दिला आहे. या रोबोटच्या माध्यमातून शिवशंकर इंगळे यांच्यावर हर्नियाची पहिली शस्त्रक्रिया डॉ. सुधीर श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडली. बुलढाणा जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी ही महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे.
यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात रोबोटिक सर्जरी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी केली. तसेच आयुष उपचार पद्धतीसाठी 'सुश्रुत' नावाचा भारतीय बनावटीचा रोबोट विकसित करण्याबाबतही एस.एस. मंत्रा रोबोटिक्स कंपनीने सकारात्मक तयारी दर्शविली.
* ६० बालकांची तपासणी; ४७ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहांतर्गत जन्मजात हृदयविकार असलेल्या बालकांसाठी २८ व २९ नोव्हेंबर रोजी मोफत टुडे इको तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून बालकांची तपासणी करण्यात येत आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी ६० बालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४७ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची टीम कार्यरत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भागवत भुसारी, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अजित शिरसाठ यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
