४ डिसेंबरला बुलढाण्यात शेतकऱ्यांचा एल्गार! तक्रारी, पीकविम्याच्या पावत्या घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
* आपला हक्क मागायचा नाही, तर लढून मिळवायचा आहे! रविकांत तुपकरांचे शेतकऱ्यांना आक्रमक आवाहन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ४ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बुलढाणा शहरात भव्य एल्गार महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चात जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे.
यावेळी केवळ घोषणाबाजी न करता प्रत्येकाच्या वैयक्तिक समस्याही प्रशासनासमोर मांडल्या जाणार आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी पीकविम्याच्या पावत्या, तर इतर नागरिकांनी आपल्या समस्यांसंदर्भातील लेखी तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे तयार करून सोबत आणाव्यात, असे आवाहन तुपकर यांनी केले आहे.
महामोर्चास्थळी विविध तक्रारी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र काउंटर उभारण्यात येणार आहेत. या काउंटरवर जमा झालेल्या तक्रारींचे गाठोडे थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवण्यात येणार असून, प्रत्येक तक्रारीचा जागेवरच निपटारा करण्याचा आग्रह प्रशासनाकडे धरण्यात येणार आहे.
तुपकर म्हणाले, ही केवळ मोर्चातील गर्दी दाखवण्याची लढाई नाही, तर आपल्या हक्काची लढाई आहे. पीकविमा मिळत नसेल, कर्जमाफी होत नसेल, बँका अडवणूक करत असतील किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयात तुमचे काम अडले असेल, तर त्या प्रत्येक प्रश्नाची लेखी तक्रार घेऊन या. तुमचा आवाज आता दाबला जाणार नाही. प्रत्येक तक्रारीचा हिशेब प्रशासनाला द्यावाच लागेल!
पुढे त्यांनी आवाहन केले की, शेतकरी बांधवांनो, शेतमजुरांनो, माता-भगिनींनो आणि युवकांनो, ४ डिसेंबरला हातातील सर्व कामे बाजूला ठेवा आणि बुलढाण्यातील एल्गार महामोर्चात सहभागी व्हा. आपल्याला न्याय मिळवायचा आहे, आपला हक्क मिळवायचा आहे. हा लढा एकट्या शेतकऱ्याचा नाही, तर आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा आहे. एवढ्या प्रचंड संख्येने या की, आपल्या एकजुटीची ताकद सरकारला दिसली पाहिजे आणि सरकारच्या पायाखालची वाळू सरकली पाहिजे. आता माघार नाही, न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील! हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई, सरसकट कर्जमाफी, हक्काचा पीकविमा आणि शेतमालाला योग्य भाव यांसह विविध मागण्यांसाठी हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे ४ डिसेंबरचा एल्गार महामोर्चा शेतकऱ्यांच्या एकजुटीचे आणि संघर्षाचे शक्तिप्रदर्शन ठरणार आहे.
