सामाजिक बांधिलकी जपत एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मदतीचा हात!
* लक्ष्मण पिंगळे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली एका महिन्याची पेन्शन ; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नागरिकांनाही पुढे येण्याचे आवाहन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज)
यंदा संपूर्ण महाराष्ट्रात अपेक्षेच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने अनेक भागांत नापिकी आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि बळीराजा मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा कठीण परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण जी. पिंगळे यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
मूळचे शेगाव येथील रहिवासी असलेले आणि सध्या बुलढाणा येथे वास्तव्यास असलेले लक्ष्मण जी. पिंगळे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी स्वेच्छेने आपल्या एका महिन्याच्या पेन्शनची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे. त्यांनी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात जाऊन धनादेशाद्वारे ही रक्कम जमा केली.
राज्यातील शेतकरी संकटात असताना केवळ शासनाकडून मदतीची अपेक्षा न ठेवता प्रत्येक नागरिकाने आपल्या परीने मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, ही भावना लक्ष्मण पिंगळे यांच्या या कृतीतून अधोरेखित झाली आहे.
* मदतीसाठी नागरिकांनीही पुढे यावे!
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना नागरिकांनीही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हातभार लावावा. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देऊन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन लक्ष्मण जी. पिंगळे यांनी केले आहे.
सेवानिवृत्तीनंतरही समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत आपल्या पेन्शनमधील एक महिन्याची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी अर्पण करण्याचा त्यांचा निर्णय निश्चितच प्रेरणादायी असून, त्यांच्या या सामाजिक योगदानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
