* घटस्थापना, मंडपोत्सव, दुसरा पालखी मिरवणूक सोहळा व लळीत कार्यक्रम; संस्थानच्या वतीने भाविकांना उपस्थितीचे आवाहन
दे. राजा : (एशिया मंच न्यूज )
ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेल्या देऊळगावराजा येथील श्री बालाजी महाराज संस्थानच्या वतीने यंदाही श्री बालाजी महाराजांचा वार्षिक यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ पासून या यात्रोत्सवाला प्रारंभ होत असून, गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी लळीत कार्यक्रमाने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. या धार्मिक सोहळ्यात महाराष्ट्रासह विविध भागांतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री बालाजी महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
संस्थानने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमपत्रिकेनुसार, रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने यात्रोत्सवाचा शुभारंभ होईल. त्यानंतर सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी मंडपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारपासून बुधवार, दि. २१ ऑक्टोबरपर्यंत दसरा पालखी मिरवणुकीचा धार्मिक सोहळा पार पडणार आहे. गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सूर्योदयाच्या वेळी लळीत कार्यक्रम होणार आहे.
याशिवाय आश्विन यात्रोत्सवाचा कालावधी दि. ११ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ असा नमूद करण्यात आला आहे. तसेच कार्तिक यात्रा उत्सव दि. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. कार्तिक मंडपोत्सव गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी, तर कार्तिक लळीत शनिवार, दि. ५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
श्री बालाजी महाराजांची यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधीत यंत्रणा प्रमुखांना निर्देश देउन आपापली जवाबदारी पार पाडण्याचे निर्देश देणे बाबत संस्थानचे वतीने जिल्हाधिकारी यांना सविस्तर पत्र देउन मागणी करण्यात आलेली आहे
श्री बालाजी महाराज हे महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असून, या यात्रोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागांतून भक्तगण दर्शनासाठी देऊळगावराजा येथे दाखल होतात. यात्रोत्सवाची ऐतिहासिक परंपरा आणि धार्मिक महत्त्व जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहेत.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच साधुसंत, गुणीजन, हरिदास, पुराणिक, भजनी मंडळी, दिंडीकरी, वारकरी आणि व्यापारी बांधवांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा. श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन संस्थानच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
राजे विजयर्सिंह जाधव (वंशपरंपरागत विश्वस्त) श्री बालाजी महाराज संस्थान, देऊळगावराजा, जिल्हा बुलढाणा यांनी सर्व भाविकांना यात्रोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.
