मुंबईत तुपकरांचा ‘गनिमी एल्गार’! पोलिसांचा वेढा भेदून मंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत धडक* कुलाबा ठाण्यात सायंकाळपर्यंत स्थानबद्ध ; शेकडो शिलेदार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात

मुंबईत तुपकरांचा ‘गनिमी एल्गार’! पोलिसांचा वेढा भेदून मंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत धडक
* कुलाबा ठाण्यात सायंकाळपर्यंत स्थानबद्ध ; शेकडो शिलेदार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात
मुंबई : (एशिया मंच न्यूज )
        शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांच्या मुंबई आंदोलनाने गुरुवारी दिवसभर राज्याच्या राजकारणाचे आणि शेतकरी चळवळीचे लक्ष वेधून घेतले. सकाळपासून ‘आऊट ऑफ रडार’ असलेले तुपकर सव्वाबाराच्या सुमारास अचानक प्रकटले आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त चुकवत मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या दिशेने कूच केली. पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर तुपकरांसह कार्यकर्त्यांना येलो गेट पोलिस ठाण्यात नेण्यात आले. काही वेळाने तुपकरांना कुलाबा पोलिस ठाण्यात हलवण्यात आले आणि सायंकाळी उशिरापर्यंत त्यांना कुलाबा पोलिस ठाण्यातच स्थानबद्ध ठेवण्यात आल्याची माहिती आहे. या संपूर्ण कारवाईमुळे बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी चळवळीतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, तुपकरांचा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केल्याची माहिती असून, वकिलांनाही त्यांना भेटू दिले जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तुपकरांच्या समर्थकांमध्ये नाराजी अधिक तीव्र झाली आहे.

* सकाळपासून मुंबईत पोलिसांचा ‘अलर्ट मोड’

          तुपकरांनी मुंबईत आंदोलनाची घोषणा केल्यापासूनच पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली होती. मंत्रालय परिसर, मंत्र्यांचे शासकीय बंगले, आमदार निवास, मरीन ड्राईव्ह यासह महत्त्वाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुंबईत येणाऱ्या कार्यकर्त्यांवरही पोलिसांची नजर होती. मागील आंदोलनांमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हटके पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाची दमछाक केली होती. मंत्रालय परिसरातील उंच झाडांवर कार्यकर्ते चढल्याची घटना विशेष चर्चेत आली होती. याच पार्श्वभूमीवर यावेळी तर मंत्रालय परिसरातील झाडांनाही पोलिस सुरक्षा देण्यात आली होती. मरीन ड्राईव्ह परिसरात सकाळपासून अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आमदार निवास परिसरातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

* शेकडो कार्यकर्ते वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत

         मुंबईत आंदोलनासाठी आलेल्या किंवा आंदोलनाच्या दिशेने जाणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत नेण्यात आले . आंदोलनस्थळी कार्यकर्ते एकत्र येऊ नयेत, यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर खबरदारी घेतली जात होती.
मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असूनही क्रांतिकारीचे काही निवडक आंदोलक थेट मंत्रालय आणि मंत्र्यांच्या बंगल्यांच्या परिसरापर्यंत पोहोचले. त्यामुळे पोलिसांच्या नियोजनाला काही प्रमाणात धक्का बसल्याचे चित्र निर्माण झाले.

*‘आऊट ऑफ रडार’ तुपकरांची अचानक एंट्री

          सकाळपासून तुपकर नेमके कुठे आहेत, याचा पोलिसांना ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे त्यांच्या संभाव्य एंट्रीबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर सव्वाबाराच्या सुमारास तुपकर अचानक आंदोलनाच्या मैदानात प्रकटले. पोलिसांच्या बंदोबस्ताची उणीव असलेला मार्ग हेरत त्यांनी गनिमी काव्याने आपल्या कार्यकर्त्यांसह मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला.
तुपकर समोर आल्याचे लक्षात येताच पोलिसांची एकच धावपळ उडाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी धाव घेतली. यावेळी तुपकर आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

* ‘सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है!’

         आंदोलकांनी ‘सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है!’ अशा घोषणा देत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. तुपकरांना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी तुपकर अत्यंत आक्रमकपणे पोलिसांच्या कारवाईचा विरोध करत असल्याचे चित्र होते.अखेर पोलिसांनी तुपकरांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. आंदोलकांना पोलिसांच्या वाहनांमध्ये बसवून वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले.

मंत्र्यांच्या बंगल्यांसमोर आणि मंत्रालयासमोरही आंदोलक पोहोचले

पोलिसांनी मंत्रालय परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप दिले होते. तरीही आंदोलकांनी गनिमी काव्याने मंत्र्यांच्या बंगल्यांसमोर आणि मंत्रालयासमोर पोहोचत घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांची मोठी धावपळ झाली.
तुपकरांना ताब्यात घेण्यात आले असले तरी आंदोलनाचा उद्देश आणि शेतकऱ्यांच्या मागण्या यामुळे हा विषय दिवसभर चर्चेत राहिला.

* तुपकरांचा मोबाईल जप्त; वकिलांनाही भेट नाकारल्याची माहिती

        तुपकरांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना प्रथम येलो गेट पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर काही वेळाने त्यांना कुलाबा पोलिस ठाण्यात हलवण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत तुपकरांना कुलाबा पोलिस ठाण्यात स्थानबद्ध ठेवण्यात आले होते. दरम्यान, तुपकरांचा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. तसेच, त्यांच्याशी कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी आलेल्या वकिलांनाही तुपकरांना भेटू दिले जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. या माहितीमुळे तुपकरांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तुपकरांना औषधांच्या गोळ्या घेऊ दिल्या जात नसल्याचेही सांगण्यात येते आहे.

* शेतकऱ्यांच्या ‘या’ मागण्यांसाठी तुपकरांचा एल्गार

           तुपकरांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या मिळणाऱ्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाऐवजी दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी केली आहे. याशिवाय पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, जुन्या कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि कर्ज पुनर्गठनामुळे कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करावा, अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत. या मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, यासाठीच मुंबई आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

* बुलडाण्यासह राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया; आंदोलन दडपल्याचा आरोप

           तुपकरांना ताब्यात घेतल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरातून शेतकरी चळवळीतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणाऱ्या नेत्याला आणि कार्यकर्त्यांना अशा प्रकारे स्थानबद्ध करून आंदोलनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तुपकर समर्थकांकडून केला जात आहे.
एकीकडे शेकडो कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत ताब्यात घेण्यात आले, तर दुसरीकडे तुपकरांना दिवसभर कुलाबा पोलिस ठाण्यात स्थानबद्ध ठेवण्यात आले. मोबाईल जप्त आणि वकिलांनाही भेट नाकारल्याची माहिती समोर आल्याने हा मुद्दा आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत रविकांत तुपकर यांना कुलाबा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते.