मुंबई : (एशिया मंच न्यूज )
सकाळपासून मुंबई पोलिसांना हुलकावणी देत ‘आऊट ऑफ रडार’ असलेले शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर अखेर आंदोलनाच्या मैदानात प्रकटले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त चुकवत गनिमी काव्याने मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न तुपकरांनी केला. सव्वाबाराच्या सुमारास तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आंदोलकांना पोलिसांच्या वाहनांमध्ये बसवून नेण्यात आले.
* बंदोबस्त चुकवत तुपकरांची ‘गनिमी एंट्री’!
तुपकरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून मंत्रालय परिसर, मंत्र्यांचे शासकीय बंगले, आमदार निवास आणि मरीन ड्राईव्ह परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक कार्यकर्त्यांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, एवढा कडेकोट बंदोबस्त असतानाही तुपकरांनी पोलिसांना चकवा देत आंदोलनासाठी वेगळी वाट पकडली. ज्या भागात पोलिस बंदोबस्त तुलनेने कमी आहे, तो मार्ग हेरत तुपकरांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दिशेने कूच केली. तुपकर अचानक समोर आल्याने पोलिसांची ऐनवेळी धावपळ उडाली.
* सव्वाबाराच्या सुमारास तुपकर पोलिसांच्या ताब्यात
सकाळपासून पोलिसांच्या रडारवर नसलेले तुपकर सव्वाबाराच्या सुमारास पोलिसांच्या ताब्यात आले. सकाळपासून ‘तुपकर कुठे आहेत?’ हा प्रश्न चर्चेत असतानाच त्यांनी अचानक आंदोलनस्थळी एंट्री घेत मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दिशेने कूच केल्याने पोलिसांची धावपळ उडाली.
तुपकरांना ताब्यात घेतल्यानंतरही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू होती. या कारवाईमुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
* शेतकऱ्यांच्या ‘या’ मागण्यांसाठी आंदोलन
रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांऐवजी दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. यासोबतच पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, जुन्या कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि कर्ज पुनर्गठनामुळे कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात यावा, अशा मागण्या तुपकरांनी केल्या आहेत. या मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी मुंबईत आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि वाहनांचा प्रतीकात्मक जाहीर लिलाव करण्याची घोषणाही तुपकरांनी केली होती.
* सरकारच्या दडपशाहीचा तुपकरांकडून निषेध
ताब्यात घेण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना तुपकरांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी या कारवाईचा निषेध केला.एकीकडे आंदोलनकर्त्यांची धरपकड, दुसरीकडे मुंबईतील विविध भागांत पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि त्यात तुपकरांची अचानक झालेली ‘गनिमी एंट्री’ यामुळे आजच्या आंदोलनाला चांगलीच रंगत आली.
