शेतकऱ्यांचा सिबिल खराब होणार नाही* आमदार श्वेताताई महालेंच्या पुढाकाराला यश* मुख्यमंत्र्यांनी शेतकरीहितासाठी दिले उपाययोजनांचे निर्देश


शेतकऱ्यांचा सिबिल खराब होणार नाही
* आमदार श्वेताताई महालेंच्या पुढाकाराला यश
*  मुख्यमंत्र्यांनी शेतकरीहितासाठी दिले उपाययोजनांचे निर्देश
चिखली : (एशिया मंच न्यूज )
        पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना एकवेळ समझोता पद्धतीने कर्जाची परतफेड करताना त्यांचा सिबिल स्कोर कमी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने, या गंभीर प्रश्नाकडे आमदार श्वेताताई महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले.

        मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, सरकारने दिलेली शेतकरी कर्जमाफी ही राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी योजना आहे. मात्र, दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना लाभ घेताना त्यांच्या सिबिल स्कोरवर विपरित परिणाम झाल्यास भविष्यात पीक कर्ज, शेती विकासासाठीचे कर्ज तसेच इतर बँकिंग सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण होत असून या संदर्भात शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

     यासंदर्भात आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाची परतफेड ओटीएस ऐवजी नियमित कर्ज परतफेड पद्धतीने करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा किंवा कर्जमुक्तीचा लाभघेताना शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर कमी होणार नाही, यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित सहकार विभागाच्या सचिवांना या विषयाचा तातडीने अभ्यास करून शेतकऱ्यांच्या हिताचे उपाय सुचविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर होण्यास मदत होणार असून, भविष्यात त्यांना कर्जपुरवठा सुरळीत राहण्यासाठी सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आमदार श्वेताताई महाले यांच्या पुढाकारामुळे केवळ चिखली विधानसभा मतदार संघातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.