* राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांची आंदोलनस्थळी भेट
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काच्या पीकविमा तसेच विविध प्रलंबित प्रश्नांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समाजातील विविध घटकांचा वाढता पाठिंबा मिळत असून, आज 15 जून रोजी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला.
आंदोलनस्थळी रविकांत तुपकर यांची भेट घेतल्यानंतर बोलताना दीपक केदार यांनी राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काच्या पीकविमा आणि इतर प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारची भूमिका ही केवळ आश्वासनांची फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीत "सातबारा कोरा" करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारने आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना दीपक केदार म्हणाले की, शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची तळमळ, संघर्षशील भूमिका आणि न्यायासाठी लढण्याची वृत्ती ही प्रेरणादायी आहे. "शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी राज्यभर निर्णायक लढा उभारण्याची ताकद रविकांतभाऊंमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे," असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा, खत-बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील सरकारी उदासीनतेविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनाला ऑल इंडिया पँथर सेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा संघर्ष अधिक व्यापक करण्यासाठी आणि राज्यभरातील शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेना सक्रियपणे सहभागी होईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
यावेळी रविकांत तुपकर यांनी दीपक केदार यांचे आभार मानत सांगितले की, शेतकऱ्यांच्या लढ्याला समाजातील विविध संघटना आणि घटकांकडून मिळणारा पाठिंबा हा संघर्ष अधिक बळकट करणारा आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेली ही चळवळ आता जनआंदोलनाचे स्वरूप धारण करत असून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही.
* वाढत्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला नवी ऊर्जा :
बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला पहिल्याच दिवशी विविध सामाजिक, राजकीय आणि शेतकरी हिताच्या संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीकविम्यासाठी सुरू असलेल्या या लढ्याला नवी ऊर्जा मिळत असून आंदोलन अधिक व्यापक स्वरूप धारण करत आहे.
दीपक केदार यांनी व्यक्त केलेला विश्वास आणि जाहीर पाठिंबा हा निश्चितच संघर्षाला बळ देणारा असून त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष अधिक ताकदीने आणि व्यापक स्वरूपात सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
