कर्जमाफी नव्हे ही तर वन टाइम सेटलमेंट योजना ! : रविकांत तुपकरांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
* रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात!
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
राज्य सरकारने जाहीर केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली होती. आज १५ जूनच्या सकाळपासून या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. बुलढाण्यातील चिखली रोडवरील निवासस्थानसमोरच रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी टप्प्याटप्याने बुलढाण्यात पोहचणार आहेत. अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी रविकांत तुपकर यांनी आई–वडिलांचे दर्शन घेतले. पत्नी शर्वरी तुपकर यांनी रविकांत तुपकर यांचे औक्षण केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारने जाहीर केलेली योजना कर्जमाफी योजना नसून "वन टाइम सेटलमेंट" योजना असल्याचा आरोप केला.
राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना फसवी असून त्यात असलेल्या जाचक अटी आणि शर्तींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार असल्याचा आरोप करीत रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. बुलढाण्यातील चिखली रोडवरील निवासस्थानसमोरच शेतकऱ्यांनी मंडप उभारला असून त्यात रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. मंचावर लावलेला शहीद भगतसिंगांचा फोटो आंदोलकांमध्ये जोश भरत आहे. प्रारंभी माध्यमांशी संवाद साधताना रविकांत तुपकर म्हणाले की, राज्य सरकारला जनाची नाही तर मनाची देखील लाज नाही. आधी कर्जमाफी करणार असल्याचा शब्द दिला, नंतर फसवेगिरी केली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतून अतिशय मोजक्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते, एवढ्या जाचक अटी आणि शर्ती या योजनेत लावल्या आहेत. सरकारचा हा निव्वळ नौटंकीपणा असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी यावेळी केला.
* शेतकऱ्यांसाठी बलिदान द्यायला तयार..
आधीच सरकारच्या बिनडोक धोरणामुळे शेतकरी अडचणीत आहेत. आयात निर्यातीचे चुकीचे धोरण, पाडलेले शेतमालाचे भाव, वाढलेले खताचे, औषधांचे आणि बियाण्यांचे भाव यामुळे शेतकऱ्याच्या गळ्याला आधीच फास लागलेला आहे. उद्योगपतींना फायदे मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांचे बळी या सरकारला हवे आहेत. शेतकऱ्यांच्या रक्ताची एवढी भूक लागली असेल तर मी स्वतः बलिदान द्यायला तयार आहे..आता काहीही झाले तरी चालेल पण माघार नाही म्हणजे नाही.. शेतकरी आंदोलनाचा हा वणवा राज्यभर पेटेल.. हे आंदोलन सरकारला महागात पडेल असेही रविकांत तुपकर म्हणाले.
* ही वन टाइम सेटलमेंट..
महाराष्ट्रातला शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतो आहे. सरकारने सांगितले होते की आम्ही सरसकट कर्जमुक्ती करू, सातबारा कोरा करू, पण पावणे दोन वर्ष उलटले तरी काहीही केलेले नाही. सध्या जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे वसुलीचा धंदा आहे. एखाद्या शेतकऱ्यावर पाच लाखांचे कर्ज असेल तर शेतकऱ्याने आधी ३ लाख भरायचे, मग सरकार दोन लाख भरेल.. शेतकऱ्यांनी ३ लाख कुठून आणायचे? असा सवाल करीत शेतकऱ्याला तीन लाख आणण्यासाठी पुन्हा सावकाराच्या दारात जाऊन कर्ज घ्यावे लागेल असे तुपकर म्हणाले. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी नाही तर "वन टाइम सेटलमेंट" योजना आहे असेही तुपकर म्हणाले.
* हे शेतकऱ्यांचे आंदोलन..
हे आंदोलन कुण्या पक्षाचे किंवा संघटनेचे आंदोलन नाही. हे आंदोलन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू केलेले आंदोलन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गावागावातील शेतकऱ्यांनो आता रस्त्यावर उतरा . फसव्या कर्जमाफीच्या जीआरची होळी करा असे आवाहन तुपकर यांनी केले.
