भीक द्या भिक द्या... कंगाल सरकारसाठी भीक द्या !
बुलढाण्यात शेतकऱ्यांचे अनोखे भिगमाको आंदोलन
* रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ 16 जून रोजी बुलढाणा येथे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस असून अद्यापही सरकारने दखल नघेतल्याने शेतकरी आणि कार्यकर्ते संतापले आहेत दरम्यान, एकीकडे व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, त्यामुळे या सरकारला भीक मागून पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांनी बुलडाण्यात अनोखे आंदोलन केले. भीक द्या, भीक द्या, कंगाल सरकारला भिक द्या असे म्हणत शहरातून फेरी निघाली आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व जमा झालेले रक्कम देण्यात आली.
रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्हाभरातील विविध गावांमध्ये आंदोलने पेटत आहेत. बुलढाणा येथील तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलन स्थळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. सरकार अद्यापही या आंदोलनाची दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. 16 जून रोजी दुपारी ॲड. शर्वरी तुपकर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन केले. शहरातील मुख्य बाजार लाईन व विविध भागांत भीक मागण्यात आली. विविध दुकानदार, सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांनी कार्यकर्त्याच्या झोळीत पैसे टाकून त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. मुख्य बाजार लाईन मधून फिरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यापासून अडविले. त्यामुळे पोलीस आणि शेतकरी व कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. नंतर यातील काही मोजक्या जणांना आत सोडण्यात आले. आंदोलना दरम्यान जमा झालेली रक्कम शासनाला सुपूर्द करत शेतकऱ्यांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यात आली तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सुपूर्त करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सांगितले की, उद्योगपतींची तब्बल १६ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे, मात्र अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अटी आणि शर्तींचा डोंगर उभा केला जात आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी कंगाल झाले आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर आमच्याकडून भीक घ्या, पण आता तरी डोळे उघडा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या, असा संतप्त संदेश आंदोलनकर्त्यांनी दिला. सरकारने शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आणली असून ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये रविकांत तुपकर यांच्या सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची तातडीने दखल घेऊन सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या सर्व न्याय्य मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाला कडक इशारा देत सांगितले की, मंत्रालयाची एकही पायरी आम्ही मागे राहू देणार नाही आणि संघर्षाचा एकही टप्पा सोडणार नाही. शासनाने वेळेत निर्णय घेतला नाही तर राज्यभरातील शेतकरी गावोगावी रस्त्यावर उतरतील. आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पेटेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल. असेही निवेदनात नमूद आहे. या निवेदनाच्या माध्यमातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सरकारला अंतिम इशारा देत स्पष्ट केले आहे की, शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होत असून आता न्याय मिळेपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करण्यात येणार आहे. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे सरकारला महागात पडेल आणि शेतकऱ्यांचा उद्रेक अटळ ठरेल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
