मराठवाड्यातून संघर्षाला बळ; क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काच्या पीकविमा आणि इतर न्याय्य मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे (लातूर), मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे (हिंगोली) तसेच हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संघर्षाला जाहीर पाठिंबा दिला.
आंदोलनस्थळी उपस्थित शेतकरी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे म्हणाले की, रविकांतभाऊ तुपकर हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आहेत. शेतकरी, माती आणि संस्कृतीसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या या नेतृत्वाच्या पाठीशी आज संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. भाऊ एकटे नाहीत, तर महाराष्ट्रातील शेतकरी-शेतमजूर जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
यावेळी मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी राज्य सरकारवर टीका करत शेतकरी प्रश्नांबाबतची भूमिका स्पष्ट केली. ही कर्जमाफी योजना नसून कर्जवसुली योजना आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेला शब्द सरकारने पाळला पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीकविमा मिळालाच पाहिजे. रविकांतभाऊ तुपकर यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी नामदेव पतंगे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत मराठवाड्यासह राज्यभरातील कार्यकर्ते या लढ्यात सक्रियपणे सहभागी होणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी संघटना पातळीवर जनजागृती आणि संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रविकांत तुपकर यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानताना सांगितले की, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे सुरुवातीपासून शेतकरी चळवळीचे आधारस्तंभ राहिले आहेत. माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या शिलेदारांनी आंदोलनस्थळी येऊन दिलेला पाठिंबा हा संघर्षाला नवे बळ देणारा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्ते आता या लढ्यात उतरले असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
* राज्यव्यापी लढ्याची तयारी :
बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांतून मिळणारा प्रतिसाद पहिल्याच दिवशी वाढत आहे. शेतकरी, शेतमजूर, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त करत आहेत. त्यामुळे हा संघर्ष आता एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता राज्यव्यापी जनआंदोलनाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.
मराठवाड्यातील सहकाऱ्यांनी व्यक्त केलेला विश्वास आणि दिलेला खंबीर पाठिंबा याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीकविमा मिळाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार यावेळी पुन्हा व्यक्त करण्यात आला.
