फसव्या कर्जमाफीच्या विरोधात रविकांत तुपकरांचे 15 जून पासून अन्नत्याग !
* सरसकट कर्जमुक्ती व हक्काच्या पिकविम्यासाठी आता जीवाची बाजी लावणार : रविकांत तुपकर
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली असली तरी या योजनेतील अटी व निकषांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत आहे. ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या हिताची नसून शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे, त्यामुळे या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एल्गार पुकारला आहे. सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा पिक विमा मिळावा यासाठी 15 जून पासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रविकांत तुपकर स्वतः आंदोलनात उतरत असल्याने राज्यभर हे आंदोलन पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे आंदोलनसम्राट रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली परंतु ही कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून उलट संकटात टाकणारी आहे. या कर्जमाफी योजनेत लादलेल्या अटी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवत असल्याने ही कर्जमाफी फसवी आणि अन्यायकारक असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हजारो शेतकरी हक्काच्या पिक विमा पासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि उर्वरित पीकविमा साठी लवकरच राज्यभर आंदोलन करणार असा इशारा रविकांत तुपकर यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. तर चार दिवसांपूर्वी जळगाव जामोद येथे फसव्या कर्जमाफीचा निषेध करून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता याच मोर्चाला संबोधित करताना रविकांत तुपकर यांनी कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली होती. तुपकर नेमके कोणते आंदोलन छेडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाच रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 15 जून रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून रविकांत तुपकर त्यांच्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहेत. रविकांत तुपकर यांनी सांगितले की, विद्यमान राज्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काळात सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्ष शासन निर्णयामध्ये विविध बंधने घालून अनेक शेतकऱ्यांना योजनेच्या बाहेर ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसत आहे. शेतकऱ्याच्या अपेक्षांवर पाणी फिरणारा हा शासन निर्णय असून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचे सोडून विविध अटी शर्ती घालून कर्जमाफीचा लाभ मर्यादित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही योजना कर्जमाफी पेक्षा कर्ज वसुलीची योजना असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शतकांमध्ये राज्यभर संतापाची लाट आहे, कर्जमाफीचे विरोधात आम्ही लोकशाही मार्गाने आणि शांततेने अन्नत्याग आंदोलन करत आहोत परंतु या आंदोलनाची दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक आक्रमण होऊन राज्यभरात पेट घेऊ शकते. राज्यकर्त्यांनी वेळीच निर्णय घेत सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा राज्यभरात उद्रेक होऊ शकतो असा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिला आहे. सध्या जरी ते अन्नदान आंदोलन सुरू करत असले तरी पुढे हे आंदोलन कोणते वळण घेते याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.
