प्रतिक्षा किन्होळकरच्या शिरपेचात मानाचा तुरा
* अमेरिकेतून मिळवली एम. एस. पदवी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
अलीकडच्या काळात ग्रामीण भागातूनही शिक्षण क्षेत्रात मुली सातत्याने अग्रेसर आहेत. त्यांच्यातील जिद्द, आत्मविश्वास आणि कसून केलेली मेहनत हे त्यांच्या यशा मागचं द्योतक आहे. येथील प्रसिद्ध साहित्यिक सुभाष किन्होळकर यांची मुलगी प्रतिक्षा ही आपल्या मेहनतीच्या बळावर अमेरिकेतील नामांकित असलेल्या टेक्सॉस-डलास येथील विद्यापीठातून एम. एस. (मास्टर ऑफ सायन्स इन सायबर सेक्युरिटी ) उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. नुकताच तिचा पदवीदान समारंभ पार पडला. टेक्सॉस युनिव्हर्सिटीच्या डलास (अमेरिका) येथील सभागृहात 19 मे रोजी मान्यवरांच्या हस्ते पदवी बहाल करण्यात आले.
प्रतिक्षा किन्होळकर हिचे आई-वडील मोताळा तालुक्यातील किन्होळा गावचे मूळ रहिवासी आहेत. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. घरी थोडीफार शेती. कधी त्यात ठोंग बसते, तर कधी पोटापुरते पिकते. अतिशय हालाखीची परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी मुलीतील जिद्द ओळखून तिच्या शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले. तिच्या जिद्दीपणाला पाठबळ दिले. तिनेही अमेरिकेतून एम. एस. करत आखलेल्या स्वप्नांना वास्तवात उतरवले. ग्रामीण भागातून तिने घेतलेली ही झेप स्वप्नांना नवा आकार देऊन गेली आहे.
प्रतिक्षा चे प्राथमिक शिक्षण बुलढाण्यातील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण येथीलच भारत विद्यालयात झाले. त्यानंतर पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजला पॉलिटेक्निक (कॉम्प्युटर) केले, तर ग्यानबा मोझे कॉलेजातून बी.ई. (कॉम्प्युटर) चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केले. त्यानंतर तिने दोन वर्ष कॅपजेमिनी या कंपनीत सहायक इंजिनिअर म्हणून काम केले.पण पुढील शिक्षणाची जिद्द तिला स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळे तिने नोकरी दरम्यान कसून अभ्यास केला आणि चांगल्या गुणांनी पास होत एम. एस.साठी अमेरिकेतील टेक्सॉस-डलास विद्यापीठात प्रवेश मिळविला.
अतिशय हरहुन्नरी आणि अभ्यासू असलेल्या प्रतीक्षाने आपल्या अथक परिश्रमातून एम. एस. पूर्ण केले. आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या दरम्यान तिला आई-वडील तसेच मामा भागवत इंगोले, कविधा इंगोले, नितीन इंगोले, कविता इंगोले, अभयसिंग थोरात, मुकुंद वैराळकर, प्रफुल्ल गार्वे, प्रीती थोरात, सौरभ किन्होळकर, प्रतीक गवळी इत्यादींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रतिक्षाने शिक्षण क्षेत्रात घेतलेली ही समुद्रापार झेप नक्कीच भूषणावह आहे.
