अवधा येथील जगदंबा देवी यात्रा महोत्सव उत्साहात

अवधा येथील जगदंबा देवी यात्रा महोत्सव उत्साहात 
नांदुरा : (एशिया मंच न्यूज )
        तालुक्यातील अवधा येथील आदिवासी पारधी समाजाचे कुलदैवत श्रीक्षेत्र आदिशक्ती जगदंबा वळेखन देवी संस्थान येथे ३ एप्रिल २०२६ रोजी जगदंबा देवी यात्रा महोत्सवात तेलगंणा, गुजराथ, मध्यप्रदेशासह राज्यातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

         या यात्रा महोत्सवादरम्यान भाविकांनी जगदंबा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर या सोहळ्याचे मूळ आकर्षण म्हणजे खुड. भजन देवी जागरात भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या सोहळ्याचा मोह देवी-देवतांनाही आवरता आला नाही व अशातच वरून राजाने पुष्प स्वरूपात पाण्याचा वर्षाव केल्यामुळे यात्रा महोत्सवा दरम्यान परिसरात आल्हाददायक वातावरण झाले होते. यावेळी आलेल्या पावसामुळे भक्तांची काही वेळ गैरसोय झाली. पाण्यापासून वाचण्याचे अत्यंत कमी प्रमाणात असलेली सुविधा, कोणतेही साधन नसल्यामुळे सर्व भक्तांनी आपापल्या परीने हा त्रास सहन करून देवीप्रती आपली श्रध्दा प्रगट केली. 
        या गैरसोयीमुळे संस्थांचे सर्व विश्वस्त, सल्लागार आदींनी भक्तांना झालेल्या त्रासा बद्दल दिलगिरी व्यक्त करून यात्रा यशस्वीतेसाठी तन-मन. धनाने सहकार्य करणाऱ्यांचे तसेच सर्व समाज बांधव, जागरे, सेवाधारी, अधिकारी, कर्मचारी आदींचे आभार व्यक्त केले.