जिल्ह्यात विधवा प्रथामुक्त गाव संकल्पना राबवावी : प्रा डी.एस. लहाने
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
विधवा प्रथम मुक्त गाव ही संकल्पना राबवणे आजची गरज आहे. टाकरखेड ग्रामपंचायतीने विधवा महिलांच्या उन्नतीसाठी पाऊल टाकले, हाच कित्ता जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींनी पुढाकार घेऊन राबवावा व विधवा प्रथा मुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी.एस. लहाने यांनी टाकरखेड मु.येथे आज केले.
टाकरखेड ग्रामपंचायत ने विधवा प्रथा निर्मूलनासाठी पुढाकार घेत नवे पाऊल टाकले आहे. ग्राम पंचायत सरपंच लता डहाके व ग्रामसेविका एस पी माने यांनी पुढाकार घेत महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी विधवा महिलांना सन्मान जनक स्थान दिले.समाजाने दूर ठेवलेल्या भगिनींना ग्रामसेविका माने यांनी बोलावून त्यांना ग्रामपंचायत च्या वतीने भेट ही दिली.विधवा महिलांना जाचणाऱ्या कुप्रथा निर्मूलनासाठी ग्रामपंचायत ने विशेष पुढाकार घेतला. याबद्दल मानस फाउंडेशनच्या वतीने आज 4 फेब्रुवारी रोजी टाकरखेड येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डी.एस. लहाने , उपाध्यक्ष गणेश निकम, संचालक प्राचार्य शाहीनाताई पठाण, प्रा. ज्योती पाटील, प्रतिभा भुतेकर, स्वाती सावजी ,अँड संदीप जाधव आदी सदस्यांनी टाकरखेड ग्रामपंचायतला भेट दिली. ताराबाई शिंदे यांची प्रतिमा, पुस्तके व सन्मानचिन्ह देऊन सरपंच व ग्रामसेविका माने यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य महिलांची उपस्थिती लाभली.
पुढे बोलताना प्रा. डी.एस. लहाने म्हणाले, विधवा महिलांसाठी जिजाऊ साहेबांनी काम केले हा त्यांचाच जिल्हा आहे. आपल्याच घरातील एक महिला इतिहासामध्ये मोठा आदर्श उभा करून गेली आहे. राज्याभिषेकाच्या वेळी जिजाऊ स्वतः उपस्थित होत्या. त्यांनी विधवा प्रथा पाळली नाही. महात्मा बसवेश्वर व चक्रधरांनी सुद्धा या महिलांना सन्मानाचे स्थान दिले आहे. त्यामुळे महापुरुषांचे विचार पुढे नेत आपण काळानुरूप बदलले पाहिजे, असे सांगितले. तर ग्रामसेविका माने यांनी आपणच आपली ढाल बना, खंबीर व्हा, तलवारी सारखे टोकदार बना, जर आपण तसे झालो तर आपले शोषण करण्याची हिम्मत कोणाची होणार नाही, असे सांगून आपल्या उद्धारासाठी आपणच पुढे आले पाहिजे, असे सांगितले. ज्योती पाटील यांनी संकटांना भिडले पाहिजे व महिला म्हणून आपण मुलांना महिलांचा आदर शिकवला पाहिजे, असे सांगितले. प्राचार्य शाहिनाताई पठाण यांनी मानस फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. स्वाती सावजी यांनी छोटे छोटे बदल जीवनात बरेच काही घडवून जातात, नवीन विचार स्वीकारला पाहिजे, असे आवाहन केले. बेटी बचाव बेटी पढाव व बालविवाह मुक्त भारत कार्यक्रमाच्या प्रतिभा भुतेकर यांनी उपस्थित महिलाना शपथ दिली , संकटग्रस्त महिलांसाठी असलेल्या शासकीय सोयी सुविधा योजनांची माहिती या वेळी देण्यात आली. संचलन निवृत्त मुख्याध्यापक खेंते सर यांनी केले. आभार अँड.संदीप जाधव यांनी मानले
*कार्यक्रमातच महिलांची शपथ :
कार्यक्रमात प्रा. डी.एस. लहाने यांनी विधवा चळवळी विषयी माहिती दिली. महिलांनी महिलांच्या उन्नतीसाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गावातील विधवा महिलांनी त्यांच्या समस्या मांडल्या तर ग्रामसेविका एस. पी. माने व प्रा. लहाने यांच्या आवाहनानुसार उपस्थित महिलांनी ग्रामपंचायत समोर विधवा प्रथा न पाळण्याची शपथ घेतली. यावेळी महिला म्हणून आम्ही सर्व सोबत आहोत अशा घोषणाही देण्यात आल्या.
