*बुलडाणा येथे ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने मंडल दिवस साजरा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बुलढाणा येथे ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने मंडल दिवस स्थानिक कार्यलयात 7 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मंडल आयोगाच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करत ओबीसी समाजाच्या मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. मंडल आयोगाची स्थापना १९७९ मध्ये मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आली होती. बी. पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या अहवालानुसार भारतात ओबीसी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असून, त्यांना २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली होती. या शिफारशींमुळे ओबीसी समाजाला शिक्षण, नोकरी आणि प्रशासनात प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी महत्त्वाचा मार्ग खुला झाला.
मात्र आजही ओबीसी समाजाच्या अनेक मूलभूत मागण्या प्रलंबित आहेत. ओबीसींची स्वतंत्र जनगणना होणे अत्यावश्यक आहे, कारण याच माध्यमातून त्यांच्या वस्तुस्थितीचा अचूक अंदाज घेतला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभेत राजकीय आरक्षण मिळणे ही ओबीसी समाजाच्या राजकीय सशक्तीकरणासाठी गरजेची बाब आहे. याशिवाय, आरक्षणाच्या अंमलबजावणीत होणारे अन्याय थांबवण्यासाठी उपवर्गीकरण आणि आरक्षण पुनर्रचना तातडीने करण्यात यावी.
0मंडल दिवसाच्या निमित्ताने ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाने या मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधत ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली. हा दिवस केवळ इतिहासाची आठवण नसून सामाजिक न्यायासाठीच्या संघर्षाचे स्मरण असून, ओबीसी समाजाच्या संविधानिक हक्कांसाठी सातत्याने लढा देण्याचा निर्धार या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला. यावेळी राज्य सल्लागार डॉ.शिवशंकर गोरे, जिल्हाध्यक्ष किशोर पवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल इंगळे, सचिव अनिल हिस्सल, बुलडाणा तालुकाध्यक्ष गजानन पडोळ, उपाध्यक्ष निलेश डुकरे, कार्याध्यक्ष जनार्धन तेजनकर, सचिव प्रशांत डहाळे, मोताळा तालुकाध्यक्ष निळकंठ उचाडे, उपाध्यक्ष सतीश मुळे, कार्यकारिणी सदस्य संजय खांडवे, राजेंद्र धोंडगे, गजानन हुडेकर,जयंत शेलेकर, मनोहर डुकरे, राहुल बाजारे इ.सदस्य उपस्थित होते.