अतिवृष्टीग्रस्त मेहकर मतदार संघासाठी ६६ कोटींची नुकसानभरपाई मंजूर* आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पाठपुराव्याला यश

अतिवृष्टीग्रस्त मेहकर मतदार संघासाठी ६६ कोटींची नुकसानभरपाई मंजूर
* आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पाठपुराव्याला यश
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
       मागील २५ व २६ जून २०२५ रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सरासरी २१२ मिमी पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना देत शासनाचे लक्ष वेधले आणि तात्काळ नुकसानभरपाईची मागणी केली होती.

          तसेच आमदार खरात यांनी मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी गत आठवड्यात लोणार व मेहकर तालुक्यातील बाधित भागांची पाहणी केली. यानंतर मदत व पुनर्वसन विभागाने तातडीने कार्यवाही करत ६ ऑगस्ट २०२५ रोजी बुलडाणा जिल्ह्यासाठी ७६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली आहे. यामध्ये मेहकर मतदार संघातील शेतकऱ्यांना तब्बल ६६ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.

            मेहकर मतदार संघातील एकूण ६५,६०१ हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून ६६ हजार शेतकरी नुकसानग्रस्त ठरले आहेत. यामध्ये फळबागांचे नुकसान, जमीन खरडून जाणे आणि गाळ साचल्यामुळे पीक नष्ट होणाऱ्या सुमारे ६ हजार शेतकऱ्यांचाही समावेश आहे. या तातडीच्या निर्णयाबद्दल आमदार सिद्धार्थ खरात यांनी पालकमंत्री मकरंद आबा जाधव पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याची भावना व्यक्त केली आहे.