दिवसाचे भारनियमन तत्काळ रद्द करा : डी.एस. लहाने* राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यकारी अभियंतांना निवेदन

दिवसाचे भारनियमन तत्काळ रद्द करा : डी.एस. लहाने
* राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यकारी अभियंतांना निवेदन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     पावसाने सर्वत्र पाठ फिरवल्याने पाण्याअभावी पिके करपू लागली आहे. काही ठिकाणी विहिरीमध्ये थोडेफार पाणी असल्याने शेतकरी पिकांना देवून पिक जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु विजेअभावी पाणी देणे शक्य नसल्याने दिवसाचे भारनियमन रद्द करावे, अशा मागणीचे निवेदन आज 5 सप्टेंबर 2023  रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता बुलडाणा  यांना देण्यात आले आहे.
     राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष डी.एस. लहाने यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, मागील एक महिन्यापासून आपल्या भागात पाऊस नाही. त्यामुळे पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. ही विदारक परिस्थिती जिल्ह्यात असल्याने शेतकरी चिंतेत आहे. काही ठिकाणी विहीरीमध्ये थोडेफार पाणी उपलब्ध आहे. ते पाणी पिकांना देवून पिक जगविण्याचा प्रयत्न करत आहे. सोयाबीन सारखे मोठ्या प्रमाणात पेरलेल्या पिकांना आज पाणी दिले नाही तर संपूर्ण पिक उध्वस्त होण्याची भिती आहे. अशा परिस्थितीत शेतकरी विहीरीतील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून पिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतू शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यायला सुरुवात केल्याबरोबरच विद्युत वितरण कंपनीने दिवसाचे भारनियमन लागू केले. रात्री 1 ते 2 वाजता लाईट उपलब्ध असते. रात्री शेतात साप, विंचू व इतर प्राण्यांची भिती आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या तोंडी आलेला घास पचविण्यासाठी दिवसाचे भारनियमन रद्द करून दिवसभर विद्युत पुरवठा उपलब्ध करावा, अशी मागणी करण्यात आली.       
     यावेळी निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष डी.एस. लहाने, महिला जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे, अतुल लोखंडे, मनिष बोरकर, संजय उबरहंडे, श्रीराम सुसर, पंजाबराव गवई, दिनकर पांडे, अॅड. संदिप जाधव, गौरव देशमुख, निलेश गाडेकर, किरण पाटील, संजय गायकवाड, विनोद पैठणे, राहुल पाटील यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.