* दोन वृद्ध आणि एका चिमुकलीवर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
गोरगरिबांसाठी शासनाने सुरू केलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातदेखील बाहेरच्या खासगी दवाखान्यात होणारे विविध प्रकारचे महागडे ऑपरेशन यशस्वीरित्या होऊ शकते, हे या ठिकाणी कार्यरत तज्ज्ञ डॉक्टरांनी दाखवून दिले आहे. गेल्या पंधरवड्यात सामान्य रुग्णालयात दोन वृद्ध आणि एका चिमुकलीवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून त्यांच्या शरीरात असलेल्या किचकट स्वरुपाच्या गाठी डॉक्टरांनी काढल्या. विशेष म्हणजे एका महिलेच्या पोटातून तीन किलो वजनाचा प्लीहा गोळा काढून तिलाही जीवदान देण्यात आले.
या तिन्ही रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. पहिल्या प्रकरणात ६५ वर्षीय महिलेच्या पोटामध्ये सिकलसेल ॲनेमियामुळे ३ किलोची प्लीहा वाढली होती. प्लीहा हा अवयव दहा पटीने वाढत गेल्याने गोळा निर्माण झाला. यामुळे महिलेस वेदना होत होत्या. गोळ्याने आतडे दबू लागल्याने महिलेस खातापिता येत नव्हते. रक्त विघटन प्रक्रिया वाढून रक्त कमी व्हायचे. त्यामुळे पाच, दहा दिवसांनी रक्त द्यावे लागत होते. हा गोळा शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला. पंधरा दिवसांपूर्वी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती ठणठणीत झाली. तिला दवाखान्यातून सुटीही देण्यात आली.
दुसऱ्या प्रकरणात जननेंद्रियाचा कर्करोग झालेल्या ८२ वर्षीय वृद्धावरदेखील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. रोगग्रस्त भाग तसेच जांघेतील गाठी काढण्यात आल्या. सध्या रुग्णाची प्रकृती चांगली असून, त्याच्यावर दवाखान्यात औषधोपचार सुरू आहेत. सामान्य रुग्णालयात रुग्णांवर किचकट स्वरुपाच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या जात असल्याने गोरगरीब कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पंधरवड्यातील तिसरी शस्त्रक्रिया एका आठवर्षीय चिमुकलीवर करण्यात आली. या मुलीच्या गळ्यात थायरोगलॉसल सिस्ट झाली होती. जीभेपासून मानेमध्ये ही गाठ आली होती. ही गाठ शस्त्रक्रिया करून समूळ काढण्यात आली. या गाठी दुर्मिळ असून, गाठीने त्रस्त एक, दोनच रुग्ण वर्षातून शस्त्रक्रियेसाठी येतात, असे डॉ. निखिल नलावडे यांनी पत्रकारांशी बोलताना बोलताना सांगितले.
कॅन्सर सर्जन डॉ. निखिल नलावडे, जनरल सर्जन तथा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भागवत भुसारी, जनरल व ट्रॉमा सर्जन डॉ. विजय निकाळे यांनी या शस्त्रक्रिया केल्या. भूलतज्ज्ञ डॉ. राजेश उंबरकर व डॉ. अविनाश सोळंकी यांच्यासह ओटी स्टॉफने सहकार्य केले.