खेळांमुळे शरीर आणि मन निरोगी राहते; व्यक्तिमत्त्व विकासातही खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व – पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील
* ३७ व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे बुलढाण्यात उत्साहात उद्घाटन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज)
व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मैदानी खेळांमुळे शरीर आणि मन निरोगी राहण्यास मदत होते. खेळाडूंमध्ये शिस्त, संघभावना, जिद्द आणि खिलाडूवृत्ती निर्माण होते. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात खेळांना महत्त्वाचे स्थान असले पाहिजे, असे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी केले.
बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ३७ व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चे उद्घाटन डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण, बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व पोलीस खेळाडूंना शुभेच्छा देताना डॉ. पाटील यांनी खेळांचे महत्त्व विशद केले. पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि सांघिक भावना अत्यंत महत्त्वाची असून, क्रीडा स्पर्धांमुळे या गुणांना चालना मिळते. खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने स्पर्धेत सहभागी होऊन आपले कौशल्य सिद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
२३ ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यात या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेत बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती ग्रामीण तसेच पोलीस आयुक्तालय अमरावती शहर या सहा पोलीस घटकांतील एकूण १ हजार ९४ खेळाडू सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेत अॅथलेटिक्स (पुरुष व महिला), बॉक्सिंग, कुस्ती, ज्युडो, तायक्वांदो, वुशू, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, १० किलोमीटर क्रॉस कंट्री आणि जलतरण अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये चुरशीचे सामने रंगणार आहेत.
स्पर्धेतील विविध खेळांचे सामने पोलीस कवायत मैदान, जिल्हा क्रीडा संकुल, सहकार विद्या मंदिर आणि जिजामाता प्रेक्षागार, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले आहेत. तर जलतरण स्पर्धा खामगाव येथील जी. एस. कॉलेजमध्ये होणार आहे. या भव्य क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील (खामगाव), विलास यामावार (बुलढाणा), संतोष खाडे (मेहकर), सोहन माछरे (मलकापूर), अर्जुन ठोसरे (देऊळगाव राजा), जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, शाखा प्रमुख, पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
