बौद्ध धर्मीयांचे एकही घर नसलेल्या यशोदा नगर वासियानी साजरी केली भीम जयंती * दहा वर्षापासून अखंड उपक्रम सुरू

बौद्ध धर्मीयांचे एकही घर नसलेल्या यशोदा नगर वासियानी साजरी केली भीम जयंती   
* दहा वर्षापासून अखंड उपक्रम सुरू
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        प्रत्येक महापुरुष त्या- त्या समाजाणे वाटून घेतले असे आपण नेहमीच बोलतो, ऐकतो व प्रत्यक्ष पाहतो सुद्धा पण, त्याला अपवाद ठरले बुलडाणा येथील सागवान परिसरातील यशोदा नगरमध्ये एकही बौद्ध समाजाचे घर नसताना तेथील मराठा व इतर समाज बांधवांनी धूम धडाक्यात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली. 
       महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचे त्यांचे हे पहिलेच वर्ष नव्हे, तर तब्बल दहा वर्षापासून हा उपक्रम ते अविरतपणे चालवित आहेत. बाबासाहेब हे एका समाजाचे नव्हे तर त्यांचे कार्य अखिल मानव समाजासाठी आहे हे केवळ भाषणातून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून यशोदा नगरवाशियांनी दाखवून दिले. हा बदल घडविण्याचे काम प्रदीप वानरे व या नगरात राहणारे नागरिक यांनी केला. इतर वार्ड प्रमाणे १४ एप्रिल रोजी सर्वच समाजातील महिला पुरुष व बालकांनी सकाळी 7 वाजता एकत्र येऊन पंचशील त्रिशरण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
        या कार्यक्रमासाठी अकोल्याचे उप जिल्हाधिकारी रुपेश खंदारे, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पवन भालेराव, सामाजिक कार्यकर्ते कुणाल पैठणकर, ऍड. कैलास कदम, दीपस्तंभ अकादमीचे प्रा. नितीन जाधव, ग्रामपंचायत सदस्य संगीताताई जाधव, प्रवीण वाघलवाळे, उमेश पूर्भे यांना निमंत्रित करण्यात आले होते. अध्यक्षीय भाषणात उपजिल्हाधिकारी रुपेश खंदारे यांनी येथील नागरिकांचे कौतुक करून यशोदा नगर वासियांचा आदर्श इतरांनी घ्यावा. तर शासन स्तरावर सुद्धा येथील रहिवाशांची दखल घेण्यासंदर्भात आपण प्रयत्न करू असे सांगून “शिक्षण, संघटन आणि संघर्ष” या बाबासाहेबांच्या त्रिसूत्रीचा असाच जागर करून समाजात समता, बंधुता प्रस्तापित करण्याचे आवाहन त्यांनी केले. 
        यावेळी कुणाल पैठणकर व पवन भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशोदा नगर येथील नितीन पाटील, शंकर बुरकुल, चाटोरीकर , संतोष पाखरे, प्रदीप वनारे, सुभाष राजपूत, श्यामजी भांगे, प्रा. दीपक लहासे, सचिन खाकरे, प्रणिलिंग घोडेस्वार, चिमणपुरे, शिरसागर, बैरागी, विनोद पाटील, शैलेसर, तायडे साहेब आणि येथील इतर महिला, पुरुष यांनी सहकार्य केले. “जय भीम”चा नारा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.