बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठया उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध विभागांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वर्षभराच्या कामाचा लेखाजोखा पाहुन निष्ठेने आणि उत्तमरित्या कामकाज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. बिराजदार व अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये सहायक अधिक्षक आर. एस. लाकडे, सुधीर जोशी, प्रवर्तक लिहीते, जगन्नाथ साबळे, स्वप्नील राठोड व भारती जैन यांचा समावेश आहे. तसेच औषध निर्माण अधिकारी गणेश डोके, संजय उंद्रीकर, रेखा भुसारी यांचाही यावेळी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हा सामान्य रुग्णालय तत्पर अणि सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्याचे काम करीत आहे. सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वयाने काम करून आपली सेवा अधिकाधिक गतीमान आणि उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन यावेळी बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिराजदार यांनी केले.