* बुलढाणेकरांनी अनुभवला एैतिहासिक कठीण चिवरदान सोहळा
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
शहरापासून थोडयाच अंतरावर.. अलौकिक निसर्ग सौंदर्याने नटलेल्या राजूर घाट माथ्यावरील धम्मगिरी महाबोधी बुध्द विहार परिसरात 23 नोव्हेबरची पहाट बुध्द पहाट ठरली. शुभ्र वस्त्र परिधान केलेले शेकडो बुध्द उपासक, उपासिकांसह अबाल- वृध्दांच्या मांदियाळीने धम्मगिरीला जणू यात्रेचे रूप आले होते. बुध्द शरणम गच्छामीच्या मंगल ध्वनींनी अवघा राजूर घाट प्रसंन्नतेने भारावून गेल्याची अनुभूती येत होती. निमित्त होते ते, धम्मगिरीवरील एैतिहासिक कठीण चिवरदान सोहळयाचे..
बुध्द धम्म संहितेत वर्षवासास अग्रस्थान आहे. यावर्षी श्रीलंका येथील पू.भिक्षू शांतचित्त स्थविर,पू.भंन्ते यश, पू.भंन्ते गुणानंद अभिभू यांचा आषाढ पौर्णिमेला वर्षावास प्रारंभ झाला होता. त्याचा समारोप कठीण चिवरदान सोहळयाने करण्यात आला. या कठीण चिवरदानाचे दायीत्व कुणाल पैठणकर यांना देण्यात आले होते..22 नोव्हेंबरला कुणाल पैठणकर यांच्या निवासस्थानावरुन सजविलेल्या रथातून शहरातील चार प्रमुख बुध्द विहारापर्यंत कठीण चिवराची दर्शनास्तव शोभायात्रा काढण्यात आली..23 नोव्हेंबरला पहाटे कठीण चिवर महाबोधी बुध्दविहार येथे नेण्यात आले. तेथे अनागरीक यांचा गुरु भंन्तेंच्या हस्ते श्रामणेर दीक्षा समारंभ संपन्न झाला. तदनंतर कठीण चिवरदान भिक्षू संघास देण्यात आले. प्रारंभी भन्ते सुयश व भन्ते यश यांनी उपस्थित बुध्द उपासक, उपासिकांना धम्म देसना दिली.
* तृष्णा ही सर्व दुःखांची जननी आहे. दुःख नाहीसे करायचे असेल तर भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जागतिक किर्तीचे बौद्ध भिक्षू तथा श्रीलंकेतील महामेणवा महाविहाराचे प्रमुख पूज्य.भंन्ते ज्ञाणानंद महास्थविर यांनी केले.
* संपूर्ण दिवसभर चाललेला हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला. या सोहळयासाठी राज्यातील विविध जिल्हयातून बुध्द उपासकांनी हजेरी लावली होती. सोहळा यशस्वीतेसाठी दि बुध्दिस्ट ग्लोबल चँरीटेबल ट्रस्टच्या पदाधिका-यांनी विशेष परिश्रम घेतले.
