बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
तालुक्यातील मौजे देऊळघाट येथील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल व माध्यमिक उर्दू/मराठी शाळेत गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून १४ ऑगस्ट २०२६ पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
* शिक्षकांची पदे रिक्त ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
शाळेतील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि रिक्त जागांवर तातडीने नूतन शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी शाळा प्रशासनाने अनेकदा संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र, या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले असून पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
मूलभूत सुविधांचीही वानवा
केवळ शिक्षकांची कमतरताच नाही, तर शाळेमध्ये मूलभूत सुविधांचाही प्रचंड अभाव आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी
सुसज्ज प्रयोगशाळा व शौचालय
विद्युत व्यवस्था (लाईट) आणि संरक्षण भिंत यासारख्या अत्यावश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा शासनाने व संबंधित शिक्षण विभागाने या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने १४ ऑगस्ट २०२६ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. बुलढाणा) यांच्या कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन/आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सदर निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांना देण्यात आले असून, या निवेदनावर रिजवान खान उस्मान खान, नंदु जगन्नाथ लवंगे, अरबाज खान बशीर खान, पत्रकार सैय्यद इरफान सैय्यद अख्तर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
