'त्यांना' सामाजिक प्रतिष्ठा देण्यासाठी ' मानसचे' बदलाचे पाऊल...
* यंदा मेहकर येथे सहावा विधवा सामूहिक विवाह सोहळा !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         विधवा विवाहाला सामाजिक प्रतिष्ठा देण्यासाठी गेल्या काही वर्षापासून मानस फाउंडेशन जोरदार प्रयत्न करीत आहे. विधवांचा विवाह म्हटला की समाज नाक मुरडायचा, परंतु नाके मुरडणाऱ्या समाजाच्या नाकावर टिचून मानस फाउंडेशनने आता पर्यंत पाच विवाह सोहळे घेतले आहे. समाज बदलाचे हे धाडसी पाऊल आहे, तर सहाव्या विवाह सोहळ्याने राज्याचे लक्ष वेधले आहे. केवळ बुलढाणा जिल्हा नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून विवाह इच्छुक एकल, विधवा , विधुर मेहकर येथील सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे.

          हनुमान मंदिर संस्थान चिखली रोड मेहकर येथे 17 मे रोजी हा विवाह सोहळा थाटात होत आहे. मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी.एस. लहाने यांच्या संकल्पनेत पहिला विवाह सोहळा सिंदखेड राजा येथे पार पडला. बुलढाणा येथील भातृ मंडळ कार्यालयात दुसरा विवाह सोहळा देखील थाटामाटात झाला. पत्रकार भवन बुलढाणा जवळच असणाऱ्या सैनिक मंगल कार्यालयामध्ये तिसरा विवाह सोहळा तर हरसोडा व पुन्हा बुलढाणा या ठिकाणी दोन सोहळे पार पडले. यंत्राचा हा सहावा विवाह सोहळा मेहकरला होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. 

      सामाजिक बदलाचे पाऊल अत्यंत कठीण असते. अनेकांना यासाठी आयुष्य पणाला लावावे लागते. विधवांच्या बाबतीत सामाजिक मानसिकता सकारात्मक करण्याचे काम प्रा.डी.एस. लहाने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करीत आहे. विधवेला स्वीकारणे ही मानसिकताच मुळात तयार होत नव्हती तर त्यांच्या मुलांना स्वीकारण्याची मानसिकता येणार कुठून? मात्र विधवा, एकल महिला आणि त्यांच्या मुलांना स्वीकारून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा देण्याचे काम बुलढाण्यातून सुरू आहे.आता याला प्रतिसादही चांगला मिळतोय. याची दखल राज्य आणि देश पातळीवर अनेकदा घेतली जात आहे.

* तीन लाखाचा विमा : भांडी व कपडे भेट : 
        या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना तीन लाख रुपयाचा विमा दिल्या जाणार आहेत नवरदेव नवरीचे कपडे व पंधरा हजार रुपयांची भांडी देखील दिली जात आहे. या विवाह सोहळ्यामध्ये एकल महिला, विधवा, घटस्फोटीत, विधुर इच्छुक यांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रा.डी.एस. लहाने यांनी केले आहे.