* रविकांत तुपकरांच्या मातेचा हृदयद्रावक आक्रोश
* शेतकऱ्यांनो थंड बसू नका पेटून उठा - गीताबाई तुपकर
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
शेतकरी, कष्टकऱ्याचा मुलगा असलेला माझा मुलगा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या मालाला अन घामाला भाव मिळवून देण्यासाठी मरमर मरतोय, आंदोलन करतोय. त्याने बळीराजासाठीच अन्न त्याग केला असून त्याचं काही बरं वाईट झालं तर सरकारच जवाबदार राहील'...त्यामुळे सरकारनं त्याच्या सत्याग्रहाची दखल घेऊन सोयाबिन-कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी कळकळीची विनवणी गीताबाई तुपकर यांनी केली.
शेतकरीविरोधी अन गेंड्याची कातडी पांघरलेल्या संवेदनाहीन सरकार बरोबरच अन्नत्याग करून जीवन मृत्यूचा संघर्ष करणाऱ्या 'स्वाभिमानी'च्या रविकांत तुपकरांनी आपल्या निवासस्थानीच अन्नत्याग सत्याग्रह सूरु केला. त्यांची प्रकृती गंभीर म्हणावी अशीच आहे. यामुळे त्यांना भेटून पाठबळ देणारे कार्यकर्ते, सामान्य शेतकरी, शेतमजुर, कामगार ते बुद्धिजीवी यांची आंदोलन स्थळी रीघ लागली आहे. यामुळे 24 तास बंदोबस्तावर असलेले पोलीस, खुपिया अन आंदोलनावर दूरवरून नजर ठेवून असणारे असे सर्वच घटक चक्रावून गेले ! आज पावेतो भेटी देणाऱ्यांनी तुपकर व त्यांच्या जिगर बाज सहकाऱ्यांना राजकीय, नैतिक पाठबळ, दिलासा, हिंमत दिली, लढण्याचे बळ दिले. यामुळे गलीतगात्र झालेल्या तुपकरांसह सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले, मात्र आज या शामियाना मध्ये आलेल्या एका महिलेच्या मनोगताने सर्वांना दुःखी केले, गहिवरून सोडले. सोबतच हा लढा तीव्र करण्याची प्रेरनाही दिली.
अगोदरच आपल्या मुलाच्या तब्येतीने चिंतेत असणाऱ्या या माऊलीच्या शब्दातून मग तीची व्यथा, पोटच्या गोळ्याबद्धल असलेली अफाट माया सर्व काही प्रकट झालं. मोठ्या प्रयासाने आपले आसू थांबवित या मातेने आपल्या भावना मांडल्या. 'माझं पोर शेतकऱ्याचं पोरग हाय, शेतकऱ्यांसाठी अन त्यांच्या मालाला भाववाढ मिळावी यासाठी लढतोय. तो शेतकऱ्यांसाठी राब राब राबतो, लढतो, त्यांच्या घामाचे भाव मागतो. सोयाबीनला 8 अन कपाशीला 12 हजार हमी भाव मागते. तो काही अंबानी नाही, शेतकऱ्याचच लेकरू हाय. त्यांच्यासाठी आज मरायला तयार आहे, त्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर सरकारच जबाबदार राहील असे त्यांनी बजावून सांगितले. त्यामुळे सरकारने त्याच्या आंदोलनाची दखल घ्यायला हवी अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. यावेळी सर्व उपस्थिताना गहिवरून आले, त्यांच्याप्रमाणे निगरगट्ट सरकारचे डोळे कधी पाणावतील? हा प्रश्न या भेटीने ऐरणीवर आला...
